साताऱ्यात HPV लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक
सातारा (प्रतिनिधी) : 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या HPV विशेष लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 8 मार्च 2026 पासून जिल्ह्यात करण्यात आला असून, या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक 24 एप्रिल 2026 रोजी पार पडली.
ही बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी डॉ. सुनिल चव्हाण (जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी), डॉ. बजरंग खाडे (साथरोग वैद्यकीय अधिकारी) तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असता 22 एप्रिल 2026 पर्यंत जिल्ह्यात केवळ 4 टक्के मुलींना HPV लस देण्यात आल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर उर्वरित सर्व मुलींचे लसीकरण मोहिमेदरम्यान पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक आठवड्याला नियमित आढावा घेऊन मोहिमेला गती देण्यावर भर देण्यात आला.
HPV लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सामाजिक न्याय, नगर विकास, ग्रामीण विकास तसेच महिला व बालविकास विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुका स्तरावर कृतीदलाच्या (TTF) बैठका घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
पालकांची संमती मिळविण्यासाठी शाळांमध्ये पालक-शिक्षक बैठकींचा उपयोग करण्यावर भर देण्यात आला. मोहिमेदरम्यान किमान 90 टक्के मुलींचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी HPV लसीकरणाबाबत जनजागृती वाढविण्याची गरज अधोरेखित केली. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी HPV लसीचे महत्त्व स्पष्ट करणारे 10 प्रमुख मुद्दे तयार करून दूरदर्शन, रेडिओ, सोशल मीडिया आदी माध्यमांद्वारे व्यापक प्रसार करण्याचे निर्देशही देण्यात आले.
एकूणच, जिल्ह्यातील HPV लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासनाने विविध स्तरांवर समन्वय साधत प्रभावी उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





















