भुईंजमध्ये भक्ती, ज्ञान आणि संस्कृतीचा उत्सव; पारायण, कीर्तन व व्याख्यानमालेला सुरुवात
![]()
२६ एप्रिल ते ३ मे दरम्यान विविध मान्यवरांची उपस्थिती; ग्रामस्थांसह संस्थांचा संयुक्त उपक्रम
भुईंज : येथील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या प्राचीन ऋषी आचार्य भ्रूगुऋषी महाराज यांच्या समाधी मठात ४९ वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव तसेच प्रवचनातून प्रबोधन करणारी कृष्णाकाठावरील ज्ञानसत्र व्याख्यानमाला दि. २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे.
या सोहळ्याचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणपूर संस्थानचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी तसेच पुसेगाव देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण व कलशपूजनाने होणार आहे. व्याख्यानमालेत समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेशबुवा रामदासी तसेच संत साहित्यिक मधु नेने अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
दि. २७ एप्रिल रोजी लोकसंत सद्गुरु नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर पुणे येथील विचारवंत विकास नाना फाटे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी प्रा. विठ्ठलराव जाधवराव राहतील. दि. २८ एप्रिल रोजी दिवंगत माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या जीवनावर कराडचे माजी आमदार आनंदराव पाटील व्याख्यान देतील, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार मदनदादा भोसले असतील.
दि. २९ एप्रिल रोजी प्रख्यात वक्ते व शिवसेना नेते प्रा. नितीन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ‘तरुण भारत’च्या आवृत्ती प्रमुख प्रगती जाधव पाटील असतील. दि. ३० एप्रिल रोजी स्वामी समर्थ प्रसारक वि. म. काळे यांचे प्रवचन होईल.
दि. १ मे रोजी आयएएस अधिकारी अभिषेक ओझर्डे यांचा सत्कार व मुलाखत आयोजित करण्यात आली असून, दैनिक पुढारीचे निवासी संपादक हरीष पाटणे, गटविकास अधिकारी नारायण घोलप व पत्रकार राहुल तांबोळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी पिसाळ करणार आहेत.
दि. २ मे रोजी ‘चाकोरीबाहेरील’ ग्रामीण कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून सूत्रसंचालन पत्रकार महेंद्र आबा जाधव व निवेदन दत्तात्रय शेवते करणार आहेत.
दि. ३ मे रोजी काल्याचे कीर्तन, सांगता सोहळा व सुवर्ण महोत्सव वर्षाचा शुभारंभ मंत्रालयाचे सचिव आर. के. धनावडे व पुणे महानगरपालिका आयुक्त तुषार बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या सर्व सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून भाविक, श्रोते व साधकांसाठी बैठकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थ मंडळ, देवस्थान ट्रस्ट, शिष्य परिवार, पारायण मंडळ, प्रेस क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ यांनी संयुक्तपणे केले आहे.





















