Sat, Apr 11, 2026
कृषी वार्ता

सातारा जिल्ह्यात अवकाळीचा कहर; ६०० शेतकरी बाधित

सातारा जिल्ह्यात अवकाळीचा कहर; ६०० शेतकरी बाधित
Ashok Ithape
  • PublishedApril 8, 2026

२४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनामे सुरू

सातारा, प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, या दोन आठवड्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५४ हून अधिक गावांना फटका बसला. एकूण २४३ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे भाजीपाला, कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे फलटण, खंडाळा आणि सातारा तालुक्यांत सर्वाधिक पडझड झाली. विशेषतः फलटण तालुक्यात डाळिंबाच्या बागांचे १०७ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले, तर खंडाळ्यात गहू आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेली पिके भिजल्याने आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खटाव, फलटण, माण, कराड परिसरात ज्वारी, कांदा, हरभरा, फळबागांचे आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासकीय आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात डाळिंब (१११ हेक्टर), गहू (४७ हेक्टर), आंबा (२८ हेक्टर), ज्वारी (२१.१७ हेक्टर) आणि कांदा (१० हेक्टर) या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या तलाठी आणि कृषी विभागामार्फत पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बाधित शेतकरी आता सरकारी मदतीच्य प्रतीक्षेत आहेत.

अवकाळी पावसाचा तडाखा एकट्या मार्च महिन्यात ४१२ शेतकऱ्यांना थेट फटका बसला असून, १९२.२१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नुकसानीचे हे सत्र एप्रिल महिन्यातही सुरूच राहिले. पावसाचा वाई, खंडाळा, फलटण, जावळी, खटाव, कऱ्हाड तालुक्यांना फटका बसला. एप्रिलमध्ये ११० हून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यामध्ये कांदा, गहू, ज्वारी आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. फलटण तालुक्यात एप्रिलमध्येही १४ हेक्टरवरील आंब्याच्या बागांना फटका बसला, तर वाई तालुक्यात १० हेक्टरवरील पिके आडवी झाली.

शेतकऱ्यांचे काढणीला आलेले लाखो रुपयांच्या कलिंगडांचे गारपिटीने नुकसान झाले आहे. पंचनामे झाले असून, लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे

नुकसानीचा संक्षिप्त आढावा – एकूण बाधित क्षेत्र : २४३.१९, बाधित शेतकरी ६०२

– फलटण तालुक्यात सर्वाधिक १२४.९० हेक्टर क्षेत्राला फटका
– डाळिंब (१११ हेक्टर), गहू (४७ हेक्टर), आंबा (२८ हेक्टर), ज्वारी (२१.१७ हेक्टर) आणि कांदा (१० हेक्टर)
– बहुतांश तालुक्यांत अवकाळी पावसाची हजेरी
– माण आणि कराड तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू   – जी२५ हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू – घरावरील पत्रे उडणे, सोलर पॅनलचे मोठे नुकसान

मार्च महिन्याच्या आखेरीस आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यासह सातारा जिल्ह्यातही अनेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्यांचे पशुधन हिरावले गेले आहे त्यांना तत्काळ तात्पुरती मदत पोहोचवली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांच्या आणि फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे आणि निर्णयाप्रमाणे सर्वांना आर्थिक मदत केली जाईल.

– मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!