निकृष्ट रस्ते कामाविरोधात वाईत रास्ता रोको; ‘वाई बंद’ला संमिश्र प्रतिसाद
![]()
सुरूर–वाई–महाबळेश्वर रस्त्याच्या संथ व निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे
वाई, प्रतिनिधी : सुरूर–वाई–महाबळेश्वर रस्त्यावरील संथ गतीने सुरू असलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात वाई शहरात बुधवारी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सकाळी सहा ते बारा या कालावधीत ‘वाई बंद’ची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने अनेक व्यवसाय सुरूच राहिले आणि एकूणच बंदचा प्रभाव मर्यादित राहिल्याचे चित्र दिसून आले.
सुरूर–वाई–पोलादपूर तसेच वाई–पाचगणी–महाबळेश्वर या मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामाची गती अत्यंत संथ असून ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने काम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या उपस्थितीत व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
त्याअनुषंगाने बुधवारी सकाळी काही नागरिकांनी वाई–सातारा रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत रस्ता अडविण्यास मज्जाव केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलकांना समज दिली. जास्त वेळ रस्ता अडवून धरल्यास गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराही देण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी समन्वयाची भूमिका घेत आंदोलकांना शांत केले आणि रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, सकाळी सहा ते बारा या वेळेत शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक व्यापारी आस्थापने सुरू असल्याने बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी बारानंतर उर्वरित बाजारपेठही खुली झाली आणि शहरातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहिले.
दरम्यान, सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर आणि व्यापारी व्यवहारांवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात नगराध्यक्ष अनिल सावंत आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. रस्त्याचे काम तातडीने दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो ओळ : वाई–सातारा रस्त्यावर बुधवारी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत व नागरिक, प्रांताधिकारी डॉ योगेश खरमाटे यांना नगराध्यक्ष अनिल सावंत पदाधिकारी व कार्यकर्ते













