मुख्यालयी न राहणाऱ्या व वेळेत सेवा न देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
![]()
तातडीच्या आरोग्य सेवेत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा
सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना तातडीच्या व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यालयी राहून कार्यस्थळी वेळेत उपस्थित न राहणाऱ्या तसेच रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा न देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहेत.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांवर वेळेत उपस्थित राहावे, तसेच कोणताही रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही याबाबत यापूर्वी अनेकदा लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांना तातडीच्या सेवांमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती, श्वानदंश, सर्पदंश, अपघात आदी प्रसंगी तातडीची सेवा उपलब्ध होत नसल्याच्या, तसेच रात्रीच्या वेळी अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र मरळी (ता. पाटण) व प्राथमिक आरोग्य केंद्र ठोसेघर (ता. सातारा) येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना असमाधानकारक कामकाजामुळे शासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्पुरते कामकाजाचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील जनतेला २४ तास तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत की नाहीत याची तपासणी राज्य व जिल्हा स्तरावरून भरारी पथकांमार्फत सुरू असून सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवानगी गैरहजर राहणे अथवा सेवा देण्यात कसूर केल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकही रुग्ण तातडीच्या किंवा रात्रीच्या अत्यावश्यक आरोग्य सेवांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहावे. अन्यथा संबंधित वैद्यकीय अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे याशनी नागराजन यांनी स्पष्ट केले आहे.













