देशपातळीवर सातारा जिल्हा बँकेची घोडदौड; अध्यक्ष नितीन पाटील व सीईओ डॉ. सरकाळे यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले
![]()
सहकाराची यशोगाथा देशाच्या व्यासपीठावर; सातारा जिल्हा बँकेला राष्ट्रीय सन्मान
सातारा : बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. खासदार श्री. नितीन पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया या नामांकित संस्थेच्या वतीने बँकिंग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. याच अंतर्गत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. खासदार श्री. नितीन पाटील यांना इंडियन बँकिंग असोसिएशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोपाल भगत यांच्या हस्ते “सर्वोत्कृष्ट चेअरमन” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. राजेंद्र सरकाळे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी पोलीस सहआयुक्त मा. श्री. संजय शिंदे यांच्या हस्ते “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डचे संचालक मा. श्री. सतीश मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टची अंमलबजावणी आणि सहकारी बँकांच्या जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रिझर्व्ह बँक, नाबार्ड तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याच्या तरतुदींनुसार कार्यरत असून अध्यक्ष मा. खासदार श्री. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने आखलेल्या ध्येय-धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, खर्चात काटकसर आणि शेतकरी केंद्रित धोरणांमुळे बँकेने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे. या सर्वंकष कार्याची दखल घेऊन त्यांना “उत्कृष्ट अध्यक्ष” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी देश-विदेशातील तीसहून अधिक देशांचा बँकिंग व कृषी क्षेत्रातील अभ्यास दौरा केला असून शेतीविषयक पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध नाविन्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल त्यांना “उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” म्हणून गौरविण्यात आले.
यावेळी मा. श्री. गोपाल भगत यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले, तर मा. श्री. संजय शिंदे यांनी देशातील आदर्श सहकारी बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा विशेष उल्लेख केला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जाहिद सिद्दीकी, श्री. प्रेषित देशमुख, ज्युरी सदस्य श्री. प्रमोद कर्नाड, श्री. यशवंत पाटील, बँकेचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत मांढरे, श्री. संभाजी यादव उपस्थित होते.
या यशाबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील, मा. खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच सर्व संचालकांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













