Thu, Feb 26, 2026
महाराष्ट्र

‘मुळा–मुठा’साठी ठोस पाऊल उचलणार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरींची माहिती

‘मुळा–मुठा’साठी ठोस पाऊल उचलणार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरींची माहिती
Ashok Ithape
  • PublishedJanuary 31, 2026

लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालिकांच्या समन्वयातून ‘नमामी गंगा’ चळवळीप्रमाणे ‘नमामी मुळा–मुठा’ अशी योजना आखून नदी सुधार प्रकल्पांतर्गत ठोस पावले उचलणार आहोत, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली.

ते येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी, पुणे (मॅनेट) या संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमापूर्वी येथे पत्रकारांशी आयोजित वार्तालाप प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रोव्होस्ट सायली गणकर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, मुळा–मुठा नदीच्या प्रदूषणामुळे पुणे शहरातील भूजल पातळी, शेती तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही समस्या भविष्यात अधिक गंभीर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून सर्वंकष नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, अवैध सांडपाणी जोडण्या तोडणे, तसेच औद्योगिक घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुळा–मुठा नदी स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलगुणवत्ता तपासणीसाठी नियमित निरीक्षण यंत्रणा, तसेच नदीकाठावरील गावांकडून पात्रात कचरा टाकला जाऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुळा–मुठा नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती सांस्कृतिक व पर्यावरणीय वारसा आहे. त्यामुळे नदीचे संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून स्थानिक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, एमआयटी एडीटी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांचा सहभाग घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. “स्वच्छ नदी, सुरक्षित भविष्य” या संकल्पनेतून मुळा–मुठा नदीला पुन्हा एकदा निर्मळ व प्रवाही करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले.

एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि प्रशासनाने कायमच मुळा–मुठा नदीचे वाढते प्रदूषण, तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात टाकला जाणारा कचरा या गंभीर विषयांकडे सातत्याने लक्ष वेधले आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुळा–मुठा ही पुण्याची जीवनवाहिनी असून तिच्या रक्षणासाठी व स्वच्छतेसाठी सरकार व प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची विद्यापीठाची भूमिका आहे. — डॉ. महेश चोपडे,
कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी–काळभोर, पुणे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!