Wed, Feb 25, 2026
स्थानिक बातम्या

ऐतिहासिक परंपरेचा जागर; वाई सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

ऐतिहासिक परंपरेचा जागर; वाई सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
Ashok Ithape
  • PublishedJanuary 26, 2026

अकरा गडकिल्ल्यांची पवित्र मृदा व पंचगंगेच्या जलपूजनाने सांस्कृतिक मिरवणुकीची थाटात सुरुवात

वाई | प्रतिनिधी : वाई शहराच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणाऱ्या वाई सांस्कृतिक महोत्सवाला रविवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. अकरा गडकिल्ल्यांच्या पवित्र मृदेचे व पंचगंगेच्या पावन जलाचे पूजन करून महागणपती घाट ते शिवतीर्थ या मार्गावर भव्य सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वाई शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी विविध आकर्षक चित्ररथांसह सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, लोककला व संस्कृतीचे दर्शन घडवत या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

वाईचे नवनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, पुढील दोन दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे.

आज सकाळी शिवतीर्थावर नगराध्यक्ष अनिल सावंत व सौ. सरिता सावंत यांच्या हस्ते पवित्र मृदा व पंचगंगेच्या जलाचे विधिवत पूजन करण्यात आले. वाईची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख राज्यभर पोहोचावी, तसेच पर्यटन व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या सांस्कृतिक महोत्सवामागील मुख्य हेतू असल्याचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी यावेळी सांगितले.

रविवारी सायंकाळी खाद्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सुप्रसिद्ध क्रांती नाना मालेगावकर यांचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून, विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

सोमवारी सकाळी नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून, या निमित्ताने वाई शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी वाईतील कलाकारांचा कला आविष्कार सादर होणार असून, वाई तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. २७ रोजी फोक प्रबोधन हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवासाठी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, नगरसेवक विजय ढेकणे, प्रसाद बनकर, संग्राम जगताप, भारत खामकर, अजित शिंदे, गुरुप्रसाद चव्हाण, शैलेंद्र देवकुळे, अपर्णा जमदाडे, केतकी पाटणे, पद्मा पाडळे, नूतन मालुसरे, ज्योती गांधी, जागृती पोरे, दीपाली सावंत तसेच वाई सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी प्रवीण जाधव, निलेश मोरे, प्रणव गुजर, परेश लाड, अविनाश रांजणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी- वाई सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांतील चित्ररथ साकारणाऱ्या कलाकार विद्यार्थ्यांसोबत नगराध्यक्ष अनिल सावंत उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के व सर्व नगरसेवक आणि नगरसेविका

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!