तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी
![]()
हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम
नांदेड, दि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून, पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ‘शब्द गुरबानी’च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले.
पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.
शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था – लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा
नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून, ही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानक, बसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे.













