सन्मान समाजप्रबोधनाचा, आदर्श पत्रकारितेचा
![]()
ज्येष्ठ पत्रकार महेंद्रआबा जाधव यांना ‘आदर्श कार्य गौरव’ पुरस्कार;

शेंद्रे : पत्रकार दिनाचे औचित्य साधून ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार तसेच अजिंक्यतारा साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख महेंद्रआबा जाधव यांना ‘आदर्श कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेंद्रे येथील स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनातील व्यवस्थापकीय कार्यालयात हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
‘प्रगती हिंदुस्तान’चे सहसंपादक विनोद गायकवाड व कराड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते महेंद्र जाधव यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अजिंक्यतारा कामगार पतसंस्थेचे व्यवस्थापक संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेंद्र जाधव यांनी पत्रकारितेतून सातत्याने केलेल्या समाजप्रबोधनात्मक, मूल्याधिष्ठित आणि निर्भीड कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या ‘प्रगती हिंदुस्तान’ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना महेंद्रआबा जाधव म्हणाले,
“आज मला मिळालेला सन्मान हा केवळ माझा नसून मी आजवर प्रामाणिकपणे केलेल्या पत्रकारितेचा आणि जपलेल्या मूल्यांचा सन्मान आहे. स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) आणि ना. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराजसाहेब) यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली समाजसेवेची शिकवण मी लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केला. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.”
या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि भुईंज प्रेस क्लब यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.













