Wed, Feb 25, 2026
शिक्षण

जिद्द, सातत्य आणि अभ्यासाच्या बळावर रोहन भोसले यांनी तीन शासकीय परीक्षांत मिळवले घवघवीत यश

जिद्द, सातत्य आणि अभ्यासाच्या बळावर रोहन भोसले यांनी तीन शासकीय परीक्षांत मिळवले घवघवीत यश
Ashok Ithape
  • PublishedJanuary 19, 2026

गडकिल्ल्यांच्या पायवाटेवरून यशाच्या शिखरापर्यंत! छंद जोपासत अभ्यासात सातत्य ठेवत रोहन भोसले यांनी साधले त्रिसूत्री यश

भुईंज : भुईंज (ता. वाई) येथील सुपुत्र रोहन ज्योतिकांत भोसले ऊर्फ ‘लाडका आबा’ याने जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर एकापाठोपाठ एक अशा तीन महत्त्वाच्या शासकीय परीक्षांत घवघवीत यश संपादन करत भुईंज गावाच्या नावलौकिकात मानाची भर घातली आहे. रोहनची वैज्ञानिक सहायक (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, गृह विभाग), उद्योग निरीक्षक आणि ग्रामपंचायत ऑफिसर या तीन पदांवर निवड झाली आहे.

गडकोट-किल्ल्यांची भटकंती आणि उत्कृष्ट फोटोग्राफीचा छंद जोपासणारा रोहन अभ्यासातही तितकाच सातत्यशील राहिला. छंद आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्याने हे उल्लेखनीय यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल भुईंज प्रेस क्लब व सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने रोहनच्या घरी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी जेष्ठ पत्रकार महेंद्रआबा जाधव, जेष्ठ संपादक कृष्णात घाडगे, भुईंज प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ, वाई तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विलास साळुंखे, उपाध्यक्ष किशोर रोकडे यांच्यासह पत्रकार महेंद्र गायकवाड, अशोक इथापे, सचिन इथापे, जितेंद्र वारागडे, हेमंत बाबर, पप्पू केसरकर, संजय माटे, किरण घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी रोहनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तीन परीक्षांत यश मिळवूनही रोहन येथेच न थांबता आता चौथ्या शासकीय परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. गडकिल्ल्यांच्या वाटा तुडवणाऱ्या त्याच्या पायांनी आज यशाचे शिखर गाठले असून, त्याचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे. रोहनच्या या यशामुळे भुईंज गावाचे नाव जिल्ह्याच्या नकाशावर उजळून निघाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!