वैष्णवी ढोकळे यांची पहिल्याच प्रयत्नात ‘सहाय्यक राज्यकर आयुक्त’ पदी निवड; ओझर्डे परिसरात आनंदाचे वातावरण
वाई, दि. १: ग्रामीण भागातील कुमारी वैष्णवी सुजाता विजय ढोकळे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर वैष्णवी ढोकळे यांची थेट सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग -१ या राजपत्रित संवर्गपदी निवड झाली आहे. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे वाई तालुक्यातील ओझर्डे परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शैक्षणिक प्रवास: वैष्णवी ढोकळे यांचे प्राथमिक शिक्षण ओझर्डे ता.वाई येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पतितपावन विद्यामंदिर, ओझर्डे येथे पूर्ण केले. विशेष म्हणजे, प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. पुढील अकरावी आणि बारावीचे शिक्षण कलासागर अकॅडमी, वाई येथे पूर्ण केल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी त्यांनी सांगली येथील नामांकित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक (कंप्युटर सायन्स) ही पदवी प्राप्त केली.
कष्ट आणि जिद्द: घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही, वैष्णवी यांनी आपल्या वडिलांचे (एस.टी. डेपो, वाई येथे मेकॅनिक) परिश्रम व त्याग प्रेरणा मानून अभ्यासात कोणतीही कसूर केली नाही. आई-वडील, आजी-आजोबा आणि कुटुंबीयांची साथ, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी हे मोठे स्वप्न सत्यात उतरवले.
अभिनंदनाचा वर्षाव: वैष्णवी ढोकळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ओझर्डे गावातील ग्रामस्थ, मित्र परिवार, एस.टी. सेवेतील मित्र परिवार, साळी समाजबांधव, नातेवाईक तसेच कलाविष्कार क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्या प्रशासनात उज्ज्वल कार्य करत समाजसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.













