बफर झोनमधील क्रशर विरोधात गुरुवारपासून लॉन्ग मार्च
![]()
वाई तालुक्यातील कुसगावचे ग्रामस्थ मुंबईच्या दिशेने करणार कुच
वाई / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील कुसगाव येथे उभारण्यात आलेल्या दगड खाण व स्टोन क्रशरला बेकायदेशीर पद्धतीने परवानगी देणाऱ्या प्रशासनाचा निषेध व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या स्टोन क्रेशर हटवण्याच्या मागणीसाठी कुसगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरुवार, दि. 17 रोजी राजधानी मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईच्या दिशेने लॉन्ग मार्चद्वारे कुसगाव परिसरातील ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न अधिक चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
सन 2021 साली महाबळेश्वर- पाचगणी प्रादेशिक योजनेतील बफर झोनमध्ये असणाऱ्या गावांमध्ये झालेले भूस्खलन व त्यामुळे झालेली जीवित हानी याचे दाखले देत राज्य शासनाला त्या गावांचे पुनर्वसनाची मागणी करणारे जिल्हा प्रशासन २०२२ साली याच परिसरात दगड- खान व स्टोन क्रशरला कायद्याला केराची टोपली दाखवत बेकायदेशीर पद्धतीने परवानगी कशी काय देते ? असा प्रश्न मौजे कुसगाव (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे विचारला असून त्याच्या प्रति तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांनाही निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत.
![]()
ब्लॅक जेम स्टोन क्रशर बफर झोनमध्ये असलेले सर्व पुरावे शासन दरबारी सादर करण्यात आले. दगड खाण व क्रशर सुरू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव नसतानाही क्रेशरला बेकायदेशीर परवाना देण्यात आला असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
दगड खाण व क्रशर असणारे क्षेत्र वन क्षेत्राला लागून असतानाही त्याला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली असल्याचे सर्व पुरावे सादर करण्यात आल्याचेही कुसगाव ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
संबंधित क्रशर व खाण बेकायदेशीर असल्याची सर्व माहिती पुराव्यानिशी जिल्हा प्रशासनासमोर सादर करूनही सन २०२४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचा आरोप करून कुसगाव ग्रामस्थ गुरुवार, दि. १७ जुलै रोजी सकाळी ११ पासून जिल्हा प्रशासनातील महसूल, गौण खनिज, जीवन प्राधिकरण, वन विभाग यातील अधिकारी यांच्या विरोधात कुसगाव ते राजधानी मुंबईतील मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार आहेत.
या प्रकरणात बेकायदेशीर कृती केल्याचा आरोप करून तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, निवासी तहसीलदार वैशाली जायगुडे यांच्यावर त्यांच्या प्रशासकीय पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी निलंबित करण्याची स्पष्टोक्ती आंदोलकांनी निवेदनात केली आहे.
त्याचबरोबर संबंधित दगड खाणीचा खानपट्टा आदेश व क्रशर परवाना रद्द करावा अन्यथा आमचे जबरदस्ती पुनर्वसन करून आम्हाला देशोधडीला लावावे, या आमच्या प्रमुख मागण्या असतील, असेही या निवेदनात म्हटले आहे. संबंधित ग्रामस्थ त्यांच्या घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती व महिला यांच्यासह सर्व तरुण मंडळी त्यांनी पाळलेल्या गाई, म्हशी, शेळी यांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने गुरुवारपासून मुंबईच्या दिशेने लॉन्ग मार्च काढतील असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या तीव्र भूमिकेमुळे कुसगावच्या क्रशरचा विषय चांगलाच चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.













