Mon, Mar 2, 2026
सामाजिक

रोटरी इंटरनॅशनलतर्फे रो.स्वाती हेरकळ यांना पीपल ऑफ ॲक्शन: ‘चॅम्पियन ऑफ पीस’ सन्मान प्रदान

रोटरी इंटरनॅशनलतर्फे रो.स्वाती हेरकळ यांना पीपल ऑफ ॲक्शन: ‘चॅम्पियन ऑफ पीस’ सन्मान प्रदान
Ashok Ithape
  • PublishedJuly 16, 2025

वाई : रोटरी इंटरनॅशनलने 2024-25 या वर्षासाठी आपल्या प्रतिष्ठित “People of Action: Champion of Peace” या सन्मानासाठी जगभरातून सहा व्यक्तींची निवड केली आहे. या निवडक मान्यवरांमध्ये रोटरी क्लब ऑफ वाई (डिस्ट्रिक्ट 3132) यांच्या सदस्या रो. स्वाती हेरकळ यांचा समावेश झाला आहे, ही संपूर्ण भारतासाठी गौरवाची बाब आहे. हा सन्मान 24 जून 2025 रोजी, कॅनडा येथील कॅलगरीमध्ये झालेल्या रोटरी इंटरनॅशनल कन्वेन्शनमध्ये प्रदान करण्यात आला.

स्वाती हेरकळ यांच्या नेतृत्वाखाली, रोटरी क्लब ऑफ वाईने ग्रामीण भागात शाश्वत शेतीचे एक अभिनव आणि प्रभावी मॉडेल तयार केले, ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांना आधुनिक व जैविक शेतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची मदत दिली. या प्रकल्पामध्ये प्रत्येकी तीन ट्रॅक्टर्स, ट्रॉलीज, ब्रॉड बेड फरो प्लॅंटर्स, रोटाव्हेटर्स, थ्रेशर्स, जैवखते निर्मितीसाठी ११०० ड्रम्स आणि पाण्याचा टॅंकर यांसारखी अत्यावश्यक शेती उपकरणे शेती औजार बँकेच्या माध्यमातून मेणवली विकास सेवा सोसायटीस देण्यात आली.

शेतीसाठी पारंपरिक आणि खर्चिक उपायांवर अवलंबून न राहता, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कसे उत्पादन वाढवता येते याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण ठरले आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी केला असून, जमिनीची सुपीकता वाढवली आहे. त्यामुळे उत्पादन वाढले आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली.

या प्रकल्पाचे काही ठळक फायदे असे आहेत की, जास्त मजुरांची आवश्यकता कमी झाली, जी सध्या मोठी समस्या बनली आहे, अत्यल्प पाण्यात उत्पादन घेता येऊ लागले, महिलांनी कंपोस्ट विक्रीतून आर्थिक स्वावलंबन मिळवले आणि युवकांचा शेतीकडे पुन्हा कल वाढू लागला.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 1,100 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, त्यांनी पर्यावरणपूरक आणि खर्च बचतीच्या शेती पद्धती आत्मसात केल्या. याचा विस्तार आता ५० गावांमध्ये करण्याचे उद्दिष्ट रोटरी क्लब ऑफ वाईने ठरवले आहे. या पुढाकारात महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणावर असून, महिला बचत गटांबरोबर सहयोग करत सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे काम सुरू आहे.

या सन्मानप्राप्तीबद्दल बोलताना स्वाती हेरकळ म्हणाल्या, “हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नव्हे, तर संपूर्ण रोटरी टीमसाठी आहे. आमचे आंतरराष्ट्रीय भागीदार पीडिजी डॉ. मीना पटेल, रोटरी क्लब ऑफ जॅक्सन टाऊनशिप (अमेरिका), तसेच मेणवली विकास सेवा सोसायटी, मेणवली, भोगाव, पांडेवाडी या गावातील सर्व शेतकरी, माझा रोटरी क्लब ऑफ वाई आणि कुटुंबीय – सर्वांचा समर्पित सहभाग यामागे आहे.”

कॅलगरी येथील रोटरी इंटरनॅशनल कन्वेन्शनमध्ये झालेल्या ब्रेकआउट सेशनमध्ये स्वाती हेरकळ यांनी स्पीकर म्हणून सहभाग घेतला. या सेशनचे मॉडरेशन UNICEF मधील रोटरी प्रतिनिधी डॉ. रोझ कार्डारेली यांनी केले. पॅनेलमध्ये क्रिस्टिना हसन, आंद्रे मारिया आणि मारिया क्रिस्टिना हे आंतरराष्ट्रीय पॅनेलिस्ट सहभागी होते.
या चर्चेत सहभागी पॅनेलिस्टांनी जगभरातील विविध सामाजिक आणि मानवीय समस्यांवर आपल्या सेवा प्रकल्पांद्वारे कसे उपाय शोधले, याविषयी अनुभव सांगितले. स्वाती हेरकळ यांनी त्यांच्या प्रकल्पातील शाश्वत शेतीच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य आणि पर्यावरणाचा समतोल कसा साधला यावर मते मांडली.

रोटरी क्लब ऑफ वाईचा हा प्रकल्प केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता, ग्रामीण पुनर्रचना, महिला सशक्तीकरण आणि शांतता प्रस्थापनेचा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. शाश्वत शेतीद्वारे समाजात आर्थिक स्थैर्य, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी या सर्व मूल्यांचा साकल्याने विचार करत त्याची अंमलबजावणी रोटरीच्या माध्यमातून होत आहे. रोटरीच्या पीपल ऑफ अॅक्शन या घोषवाक्याला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देणारे हे कार्य जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करणारे ठरले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!