Mon, Mar 2, 2026
पर्यावरण

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
Ashok Ithape
  • PublishedJune 1, 2025
सातारा  दि. १: सातारा जिल्हा निसर्गाने व झाडा झुडपांनी नटलेला आहे. यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी 1 जून रोजी राबवणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपरीषदेच्या संयुक्त विद्यमाने  पोलिस परेड मैदान येथे वृक्ष लागवड अभियानास   सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सिने अभिनेते संयाजी शिंदे, दिशा कमिटीच्या सदस्या रेणूताई येळगावकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील व नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनेक डोंगरावरील झाडांची संख्या कमी झालेली आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या सहकार्याने या डोंगरावर पुन्हा वृक्षारोपन करावे.  दर वर्षी झाडे किती लावली, किती जगली याचा आढावा घेऊन जीओ टँगींगद्वारे माहिती शासनाला सादर करणार, असल्याचेही सार्वजनिक बांधकाम श्री. भोसले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, रस्त्यांच्या रुंदीकरण कामामुळे झाडे काढावी लागतात. ज्या ठिकाणची झाडे काढली आहेत त्या ठिकाणी पुन्हा देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात ८ ते १० फूट उंचीची विविध प्रकारची २ हजार ८०० झाडे लावण्यात येणार असून या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे ११० कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान ३.३ कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा १ हजार ५१४ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, यकृळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे.  तसेच नगरपरिषदेच्यावतीने   आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारचे १ हजार २०० झाडे लावण्यात आली आहेत.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!