Mon, Mar 2, 2026
साहित्य

वाईतील वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रास १ मे पासून प्रारंभ…

वाईतील वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रास १ मे पासून प्रारंभ…
Ashok Ithape
  • PublishedApril 26, 2025

वैचारिक मेजवानी : वाईतील वसंत व्याख्यानमाला – एक ज्ञानयज्ञ

वाई:- दि.२६ :- येथील लो.टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेचे १०९ वे ज्ञानसत्र १ ते २१ मे या कालावधीत संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्या ‘ साहित्य आणि चित्रकला ‘ या विषयावरील मुलाखतीने होणार आहे. तर समारोप सिने अभिनेते अमोल पालेकर व चित्रपट दिग्दर्शिका संध्या गोखले यांची ‘ जीवन नाट्याचा चित्रमय ऐवज ‘ या विषयावरील मुलाखतीने होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर आणि वसंत व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, कार्यवाह भद्रेश भाटे, सहकार्यवाह माया अभ्यंकर, विश्वस्त अनिल जोशी, ॲड. श्रीनिवास कुलकर्णी, श्रीनिवास खरे, आदित्य चौंडे, अनुराधा कोल्हापुरे, गिरीश जाधव, अजित क्षीरसागर, ग्रंथपाल अमित वाडकर आदी उपस्थित होते.

गेली शंभर वर्ष ही वसंत व्याख्यानमाला  अखंडितपणे सुरू असून यंदा व्याख्यानमालेचे १०९ वे वर्ष आहे. येथील गणपती घाटावर दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेत १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सहा वाजता वाईतील भगिनी शिव तांडव स्तोत्र प्रस्तुत करणार आहेत. या शिवाय संस्थेच्या तळमजल्यावरील कला दालनात २ ते १२ मे पर्यंत मिथिलेश गिरीश जाधव यांचे मराठा चित्रशैलीतील वॉटर कलर पेंटिंग्जचे तर १३ ते २१ मे पर्यंत कला शिक्षक बाळासाहेब कोलार यांचे संमिश्र वॉटर कलर पेंटिंग्जचे चित्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

यंदा मान्यवर कोण?

यंदाच्या व्याख्यानमालेत अनुक्रमे मीनाक्षी पाटील ( साहित्य चित्र संवाद), इतिहास अभ्यासक मृण्मय अरबुने (शिवछत्रपतींची शस्त्रास्त्रे), नाटककार व दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर (नाट्य सिनेमातील प्रवास – मुलाखत ), डॉ.बबन डोळस व डॉ.समीर दातार ( स्पोर्ट्स सायकलीन ), डॉ.दत्ता कोहिनकर ( मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती ), कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे (शेती आणि समाज ), पद्मश्री अच्युत पालव (माझे सुलेखन प्रवास – कॅलिग्राफी ते पद्मश्री ),
अभिनेता आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर ( मुलाखत :- नाटक , चित्रपट ते सीता कादंबरी ), श्रीमती श्रेया राजवाडे व सहकारी (गीत उमलते नवे – गाणे आणि गप्पा ), इतिहास संशोधक डॉ. चैतन्य साठे (जावे राऊळाशी), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे (स्पर्धेच्या युगातील तरुणाई), विधीज्ञ डॉ.गणेश शिरसाठ (संविधान सर्वासाठी ), महाराष्ट्र बार कॉन्सिलचे सदस्य ॲड. रोहित एरंडे ( माझी मिळकत माझे वारस ), मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित ( तर्कतीर्थ आणि मराठी विश्वकोश ), डॉ.मधुबाला चिंचाळकर (अद्भुत अंटार्टिका), सी.ए.डॉ.अभिजीत फडणीस (भारत विश्वगुरु होण्यासाठी ऋषिचिंतन जागवू या ), श्री.केदार पटवर्धन (कल पक्का…), शल्यचिकित्सक डॉ. शेखर कुलकर्णी ( स्त्री आरोग्य ) , गड दुर्ग अभ्यासक श्री.शेखर राजेशिर्के (गड दुर्ग भ्रमण – एक राजस छंद ) , श्री.श्रीकांत जाधव (ए.आय – रोजच्या जगण्याचा नवा साथीदार ), आदी वक्ते आपली अभ्यासपूर्ण मते मांडणार आहेत.

बुधवार ता.२१ मे रोजी अमोल पालेकर व संध्या गोखले यांच्या ‘ जीवन नाट्याचा चित्रमय ऐवज ‘ या विषयावरील मुलाखतीने व्याख्यान मालेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्रात शतक पूर्ण केलेल्या ठराविक व्याख्यानमालेमध्ये वाईची व्याख्यानमाला अग्रस्थानी असल्याची माहिती व्याख्यानमालेची कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!