स्नेहवर्धिनीच्या वाढदिवसानिमित्त शाळेस खुर्च्यांची भेट
![]()
शिरगावच्या जि. प. शाळेत भुईंजच्या राजेभोसले कुटुंबीयांचा उपक्रम
वाई / प्रतिनिधी : शिरगाव (ता. वाई) येथील जि. प. शाळेतील विद्यार्थीनी स्नेहवर्धिनी रणजीत भोसले हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पालकांनी शाळेस एक डझन दर्जेदार खुर्च्यांची भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपत नामांकित शाळेच्या सुविधांमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाबद्दल राजेभोसले कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भुईंज येथील सुप्रसिद्ध राजवैद्य मेडिकल स्टोअर्सचे संचालक रणजीत भोसले यांची कन्या स्नेहवर्धिनी ही शिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. भुईंज परिसरात अनेक नामवंत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची उपलब्धता असूनही विविध उपक्रम राबवणाऱ्या शिरगावच्या शाळेत आपल्या मुलीचा प्रवेश घेऊन सौ. अश्विनी व रणजीत भोसले या दाम्पत्याने वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांची कन्या स्नेहवर्धिनी ही सुद्धा अत्यंत हुशार असून आपल्या आई-वडिलांचा वैचारिक वारसा समृद्ध करत आहे.
या शाळेतील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असतो. स्वतःचा वाढदिवस केक, हॉटेलिंग अशा स्वरूपात साजरा करण्याऐवजी माझ्या शाळेत काही उपयोगी वस्तू भेट देऊया, असा आग्रह तिने आपल्या पालकांकडे धरला. त्यानुसार रणजीत भोसले यांनी मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांशी चर्चा करून शाळेला उपयुक्त ठरतील अशा आणि शाळेच्या सुविधेमध्ये वृद्धी करतील अशा दर्जेदार स्वरूपातील एक डझन खुर्च्यांची भेट स्नेहवर्धिनीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला दिली.
या उपक्रमाबद्दल जि.प. आदर्श शाळा शिरगाव, शाळा व्यवस्थापन समिती यांनी राजेभोसले कुटुंबीयांना धन्यवाद दिले आहेत.
मुलांच्या वाढदिवसाला गैरवाजवी खर्च करण्याऐवजी सामाजिक बांधिलकीतून ज्ञानमंदिरास उपयुक्त ठरणारी भेट देण्याच्या राजेभोसले कुटुंबाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













