पंचायत समिती वाईचे गटशिक्षणाधिकारी श्री साईनाथ वाळेकर यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान
वाई दि १४ :- आरीन फाउंडेशन नवी मुंबई यांच्यामार्फत लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हसुरकर यांच्या शुभहस्ते पंचायत समिती वाईचे गटशिक्षणाधिकारी श्री साईनाथ वाळेकर यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक (माध्यमिक) पुरस्कार, नगरपालिका शाळा क्रमांक १० चे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री महादेव आडगळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक (प्राथमिक), किसन वीर महाविद्यालयाचे प्राध्यापक सकट यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 51 जणांना पुरस्कृत करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री संतोष हसुरकर यांनी आरीन फाउंडेशन राज्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांना गोळा करून राज्याच्या उत्कृष्टतेसाठी हातभार लावत असल्याचे सांगितले. तर गटशिक्षणाधिकारी श्री वाळेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना आरीन फाउंडेशन ने पाठीवर टाकलेली थाप आम्हाला कार्यप्रवृत्त राहण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजगुरू कोचळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सरला पाटील यांनी केले. तर आभार आरीन फाउंडेशनचे श्री किरण जाधव यांनी मानले.
कार्यक्रमास विद्या विकास परिषदेच्या अध्यक्षा सी ए सौ प्रवीणा ओसवाल, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनिता पानसे उपस्थित होत्या.













