Tue, Mar 3, 2026
सहकार

नागरी सहकारी बँकांबाबत रिझर्व बँकेची भूमिका सकारात्मक – सतीश मराठे

नागरी सहकारी बँकांबाबत रिझर्व बँकेची भूमिका सकारात्मक – सतीश मराठे
Ashok Ithape
  • PublishedNovember 10, 2024

वाई, दि १० – कर्ज थकबाकी ही सर्वच बँकांसमोरील डोकेदुखी आहे. 2020 च्या करोना महामारीनंतर अनुत्पादीत कर्जामध्ये वाढ झाली आहे. देशातील अनेक लोक नागरी सहकारी बँकांच्या माध्यमातून बँकिंगचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत नागरी सहकारी बँकांबाबत रिझर्व बँकेची भूमिका ही सकारात्मक आहे, असे प्रतिपादन रिझर्व बँकेचे संचालक डॉ. श्री सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

वाईतील दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस सदिच्छा भेट प्रसंगी डॉक्टर मराठे बोलत होते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल मोरेश्वर देव यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. मराठे म्हणाले, सद्यस्थितीत देशात बँकिंग क्षेत्र हे अग्रगण्य व चांगली कामगिरी करणारे क्षेत्र आहे. बँकेच्या माध्यमातून सामान्य लोक, उद्योजक यांचा आर्थिक विकास होत असतो. बँकिंग ही मूलभूत गरज सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. मजबूत बँकिंग व्यवस्था ही देशाची आर्थिक स्थिती व देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीचे प्रमुख माध्यम असते. रिझर्व बॅंक ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य देशाची प्रमुख अर्थ वाहिनी आहे. जगातील इतर प्रमुख बँकांच्या तुलनेत भारतीय रिझर्व बॅंक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. देशातील स्थिर सरकार हेही यामागचे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांशी निगडित असलेल्या नागरी सहकारी बँकाही सुस्थितीत असल्या पाहिजेत, ही रिझर्व बँकेची भूमिका आहे. त्यादृष्टीने रिझर्व बँकेचे संचालक मंडळ कार्यरत आहे. ही नागरी बँकांसाठी चांगली बाब आहे, असेही डॉ मराठे म्हणाले.

बँकेचे अध्यक्ष अनिल देव म्हणाले सतीश मराठे यांच्यासारख्या अनुभवी व अभ्यासू व्यक्तीच्या माध्यमातून रिझर्व बँकेचे संचालक पद भूषवण्याचे महत्कार्य पार पडत आहे. मराठे सरांना नागरी सहकारी बँकेच्या कामकाजांचा चांगला अनुभव आहे. नागरी बँकांना काही बाबतीत रिझर्व बँकेने सहकार्य केले तर नक्कीच या बँका चांगली कामगिरी करू शकतील. कोरोना महामारीचा फटका वाई अर्बन बँकेला ही बसला परंतु आम्ही त्यातून आता सावरलो आहोत. भविष्यकाळात रिझर्व बँकेला साजेशी कामगिरी आमची बँक देखील करेल यात कोणतेही शंका असण्याचे कारण नाही.
बँकेचे व्यवस्थापक मंडळ सदस्य रिझर्व बँकेतील निवृत्त अधिकारी श्री अविनाश जोशी यांनी डॉ. मराठे यांचा परिचय करून दिला. मराठे सरांच्या माध्यमातून सहकार भारती व पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व देशाच्या प्रमुख बँकेचे संचालक पद भूषवत आहेत, ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे,

बँकेचे उपाध्यक्ष शेखर कांबळे यांनी आभार व्यक्त करताना मराठे सरांचे मार्गदर्शन बँकिंग क्षेत्रातील संचालकांना उपयुक्त असते, असे सांगितले. याप्रसंगी बँकेचे संचालक माधव कान्हेरे, विवेक पटवर्धन, मकरंद मुळे, अँड. सुनीती गोवित्रीकर, रामचंद्र कानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, उपसरव्यवस्थापक संतोष बागुल आदी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!