Sat, Nov 28, 2026
सहकार

किसन वीर व खंडाळ्याचा ऊस दर ३८०० रूपये

किसन वीर व खंडाळ्याचा ऊस दर ३८०० रूपये
Ashok Ithape
  • PublishedNovember 19, 2026

दोन्ही कारखाने सुस्थितीत आणणारच; नामदार मकरंदआबा पाटील

भुईंज l दि.१९ : किसन वीर व खंडाळा साखर कारखान्याकडे गळित हंगाम सन २०२६-२७ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास प्रतिटन ३ हजार ८०० रूपये दर देण्यात येणार असुन येणाऱ्या काळात दोन्ही कारखाने सुस्थितीत आणणार असल्याची माहिती, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटले आहे की, मागील ४ वर्षांपासुन अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन मार्गक्रमण करीत असताना आम्ही अतिशय पारदर्शक व शेतकरी हिताय असा कारभार केलेला आहे. मागील संचालक मंडळाच्या काळातील सन २०२०-२१ ची शेतकन्यांची थकीत ६४ कोटींचे ऊस बील ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेली होती. कारखान्याप्रती शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. परंतु आपला हक्काचा सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे, या उद्दात्त हेतुने प्रेरित होऊन सभासदांनीच आपला कारखाना वाचविला. त्यामुळेच आपण गळित हंगामाची सुरूवात करू शकलो.

स्व. नामदार अजितदादा पवार यांच्यामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याला नवसंजिवनी मिळाली. मागील ४ हंगामामधील शेतकरी, शासकीय देणी, वाहतुकदार, कंत्राटदार व इतर सर्व देणी ज्या त्या वेळीच दिलेली असल्यामुळे कारखान्यावरील विश्वासार्हता वाढलेली आहे. सन २०२६-२७ चा गळित हंगाम शेतकरी व कामगारांच्या विश्वासाच्या जोरावरच गाळपाचे जे उद्दीष्ठ संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे, ते पुर्ण करणार आहोत. ऊस उत्पादकांनीही आपल्या ऊस बीलाबाबत साशंकता बाळगु नये. ऊस बील वेळेवर देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याचे गाळप हे पुर्ण क्षमतेने सुरू असुन को-जन व डिस्टीलरी प्रकल्पही सुस्थितीत सुरू आहेत.

किसन वीर कारखान्याचे २५ दिवसामध्ये १ लाख तर खंडाळा कारखान्याचे ३३ दिवसामध्ये ९९ हजार गाळप झालेले आहे. मागील काही दिवसांमध्ये सोशल मिडीयावर किसन वीर कारखान्याच्या दराबाबत पोस्ट फिरत होती. ती पोस्ट अधिकृत नसल्याचही व्यवस्थापनाकडुन सांगण्यात आलेले होते. सुज्ञ शेतकऱ्यांनी अशा गोष्टींवर व अफवांवर विश्वास न ठेवता आपण जी कारखान्याची जबाबदारी दिलेली आहे, ती पुर्ण क्षमतेने पार पाडुन किसन वीर व खंडाळा कारखाना येणाऱ्या काळात गतवैभव मिळणार असल्याचेही नामदार मकरंदआबा पाटील यांनी सांगितले.

गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला चांगल्या प्रतीचा संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गळितासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक उत्तम पाटील व संचालक मंडळाने केलेले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!