Tue, Sep 29, 2026
क्रीडा

ज्ञानदीपच्या रणरागिणींचा राज्यस्तरीय हॅण्डबॉलमध्ये डंका!

ज्ञानदीपच्या रणरागिणींचा राज्यस्तरीय हॅण्डबॉलमध्ये डंका!
Ashok Ithape
  • PublishedSeptember 27, 2026

अंतिम सामन्यात मुंबई शहरावर १३-९ गोलने मात; सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

वाई, दि. २७  : नवी मुंबई येथील विभगोर हायस्कूल, खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये वाई येथील ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी ऐतिहासिक कामगिरी करत राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात सातारा-ज्ञानदीप संघाने मुंबई शहराच्या संघावर १३-९ गोलने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

ज्ञानदीपच्या रणरागिणींनी संपूर्ण स्पर्धेत आक्रमकता, आत्मविश्वास, शिस्त आणि उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडविले. बलाढ्य संघांविरुद्ध प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करत त्यांनी सातारा जिल्ह्यासह वाईच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ज्ञानदीपच्या संघाने रायगड जिल्ह्याचा ७-६ गोलने पराभव केला. त्यानंतर मुंबई उपनगर संघावर तब्बल २०-४ गोलने दणदणीत विजय मिळवत संघाने आपली विजेतेपदाची दावेदारी भक्कम केली. उपांत्य सामन्यात पुणे संघाचा ९-७ गोलने पराभव करत ज्ञानदीपच्या मुलींनी अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

अंतिम सामन्यात मुंबई शहराच्या संघासमोरही ज्ञानदीपच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड निर्माण केली. उत्कृष्ट बचाव, अचूक पासिंग आणि प्रभावी आक्रमणाच्या जोरावर त्यांनी १३-९ गोलने विजय मिळवत महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मेहनत, शिस्त, सांघिक भावना आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या हॅण्डबॉल क्षेत्राला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली आहे. वाईच्या क्रीडा क्षेत्रातही या ऐतिहासिक विजयाची विशेष चर्चा होत असून, ज्ञानदीपच्या खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

विजेत्या संघातील रणरागिणी

या ऐतिहासिक विजेत्या संघात आर्या समीर जाधव, जान्हवी सूर्यवंशी, शमिका ढोले-पाटील, श्रद्धा वाघमारे, शरयू जाधव, ऋत्वा खांडे, आराध्या पिसाळ, स्पृहा पवार, ईशा निकम आणि अंकिता कदम यांचा समावेश आहे.

या संघाला मार्गदर्शक सचिन लेंभे सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी स्पर्धेपूर्वी कठोर सराव करत खेळातील सातत्य आणि सांघिक समन्वय साधला.

या ऐतिहासिक यशाबद्दल ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शुभांगी पवार, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सचिव बाळकृष्ण पवार, खजिनदार चंद्रकांत शिंदे, विश्वस्त विश्वनाथ पवार, जिजाबा पवार, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, दिलीप चव्हाण, विजय कासुर्डे, रविंद्र केंजळे, दुष्यंत जगदाळे, दत्ता मर्ढेकर, तसेच सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन (काका) पाटील, क्रीडाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, क्रीडाक्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

ज्ञानदीपच्या या रणरागिणींनी मिळविलेल्या राज्यस्तरीय विजेतेपदामुळे वाई परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “खेळाच्या मैदानावर ज्ञानदीपचा झेंडा!” अशी भावना व्यक्त होत आहे.

फोटो कॅप्शन :
महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर चषक स्वीकारताना मार्गदर्शक सचिन लेंभे सर व ज्ञानदीप स्कूलच्या विजेत्या खेळाडू विद्यार्थीनी.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!