विद्यार्थ्यांनी कायद्याचा आदर करून सुरक्षित व उत्तम नागरिक बनावे
पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचे ज्ञानदीप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वाई : विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करून शिस्त, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी जपत उत्तम नागरिक बनावे, असे आवाहन वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.
ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाई येथे गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच विद्यार्थी परिषद पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी बोलत होते.
यावेळी विद्यावर्धिनी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त दिलीप चव्हाण, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये. वाहन चालवल्यामुळे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अशा प्रकरणात पालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
विद्यार्थ्यांना छेडछाड, धमकी किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तो लपवून न ठेवता तातडीने पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती द्यावी. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये आणि संकटाच्या प्रसंगी त्वरित पोलीस तसेच संबंधित हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शासकीय स्कॉलरशिप प्राप्त गुणवंत विद्यार्थी, विश्वकोश ज्ञानवर्धन राज्यस्तरीय प्रावीण्य प्राप्त विद्यार्थीनी तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नवीन विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभही उत्साहात पार पडला. नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना प्राचार्या शुभांगी पवार यांनी पदाची शपथ दिली. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात विश्वस्त प्रा. दत्तात्रय वाघचवरे तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन लेंभे, शिला खाडे, अस्मिता भोसले, अर्चना जाधव, आरती भापकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ : स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थीनी कु. श्रेया पोरे हिचा सन्मान करताना पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी. शेजारी प्राचार्या शुभांगी पवार, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर व दिलीप चव्हाण.





















