सीड बॉलच्या माध्यमातून हिरव्या भविष्यासाठी अनोखा संकल्प!
![]()
सोनजाई डोंगर परिसरात देशी वृक्षांच्या बियांची पेरणी; “प्रत्येक कुटुंबाने दरवर्षी किमान दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे” – सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव
वाई | प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून प्रत्यक्ष कृती करणे ही काळाची गरज आहे. याच भावनेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वाई तालुक्यातील सोनजाई नगर येथील सोनजाई डोंगर परिसरात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय खंडू जाधव आणि सौ. छाया जाधव यांनी देशी वृक्षांच्या बियांची पेरणी व सीड बॉल (Seed Ball) पद्धतीने वृक्षलागवडीचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
या उपक्रमात कडुलिंब व चिंचेच्या सीड बॉलची निर्मिती करून त्यांची डोंगर परिसरात पेरणी करण्यात आली. तसेच आंबा, जांभूळ, फणस आणि साग यांसारख्या भारतीय देशी वृक्षांच्या बिया जमिनीत पेरून भविष्यात हिरवाई फुलविण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी बोलताना दत्तात्रय जाधव म्हणाले की, “बेसुमार वृक्षतोड, नव्याने वृक्षलागवडीबाबतचा कमी होत चाललेला उत्साह आणि पर्यावरणाविषयीची उदासीनता यामुळे पर्जन्यमान अनियमित होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या परिस्थितीस आपण सर्वजण काही प्रमाणात जबाबदार आहोत. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.” त्यांनी प्रत्येक कुटुंबाने दरवर्षी किमान दोन देशी झाडे लावून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीतून दिलेला हा संदेश निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाची जनजागृती अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होत आहे. समाजातील प्रत्येकाने आपल्या परिसरात अशाच प्रकारचे उपक्रम राबवून हिरवाई वाढविण्यासाठी हातभार लावण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.





















