राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावची सुवर्णमय झेप; विद्यार्थ्यांची पदकांची लयलूट
![]()
मुलांच्या संघाला कांस्यपदक, यशदा वाडकरला दुहेरी रौप्यपदक; ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ व ‘राष्ट्रीय पदक विजेती’ सन्मानाने गौरव
वाई, प्रतिनिधी : न्यू इंग्लिश School, बोरगाव (ता. वाई) येथील विद्यार्थ्यांनी दि. २८ व २९ जून २०२६ रोजी नाशिक येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय सीनियर जंप रोप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
स्पर्धेतील ३० सेकंद स्पीड रिले या प्रकारात विद्यालयाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक (तृतीय क्रमांक) पटकावले. या विजयी संघात श्रवण वाडकर, यश मालुसरे, ऋषभ मांढरे, अनुज महांगडे आणि ऋतिक मांढरे (इयत्ता नववी) यांचा समावेश होता.
याशिवाय यशदा मेघा वाडकर (इयत्ता नववी) हिने ३० सेकंद स्पीड आणि फ्री स्टाईल या दोन्ही प्रकारांत दमदार कामगिरी करत दुहेरी रौप्यपदक (द्वितीय क्रमांक) मिळविले. वर्षभरातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिला महाराष्ट्र राज्य जंप रोप संघटनेकडून ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ तसेच ‘राष्ट्रीय पदक विजेती’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष नारायण वाडकर (गुरुजी), सचिव मधुकर वाडकर, माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वाडकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संतोष वाडकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्ह्याच्या नूतन क्रीडा अधिकारी संगिता जगताप आणि जंप रोप असोसिएशनचे जिल्हा सचिव नितीन सुरवसे यांनीही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच जंप रोप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजित वाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





















