थेट मुलाखत, थेट निवड; युवक-युवतींसाठी वाईत रोजगाराचा महाकुंभ २७ जून रोजी
![]()
एका छताखाली नामांकित कंपन्या आणि थेट नोकरीची संधी; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा पुढाकार
वाई, दि. २३ : सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाई येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाई नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्यात ५ हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महागणपती मंदिर परिसरात हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन जागेवरच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
५ वी पास ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा व अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांसाठी संधी मिळणार आहे.
युवकांना स्वावलंबी बनविणे आणि स्थानिक तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले. वाई शहरासह ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे आवश्यक असून ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसाठी हा मेळावा महत्त्वाची संधी ठरणार आहे.





















