कर्तव्यनिष्ठेचा सन्मान! सातारा LCB चे राजू मुलाणी यांना महासंचालक पदक जाहीर
![]()
अष्टपैलू कामगिरीची राज्यस्तरीय दखल; सातारा पोलीस दलाचा वाढला मान
भुईंज प्रतिनिधी I महेंद्रआबा जाधव
पोलीस दलात केवळ कर्तव्य पार पाडणे नव्हे, तर समाजहितासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान झाला की संपूर्ण विभागाचा अभिमान उंचावतो. सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) धडाडीचे अंमलदार राजू मुलाणी यांना प्रतिष्ठेचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर झाले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सातारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राजू मुलाणी यांनी आपल्या सेवाकाळात अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी तांत्रिक विश्लेषण, बातमीदारांचे मजबूत जाळे आणि तपासातील चिकाटी यांच्या जोरावर अनेक अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. दरोडे, घरफोड्या, खून तसेच अवैध धंद्यांविरोधातील कारवायांमध्ये त्यांनी कायम ‘ऑन फिल्ड’ राहून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ हे पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचे पदक मानले जाते. सलग पाच वर्षे निष्कलंक सेवा आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा सन्मान प्रदान केला जातो. मुलाणी यांनी आपल्या कामातील सातत्य, प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
मुलाणी यांना हा सन्मान जाहीर झाल्याबद्दल सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी विश्वजित घोडके आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राजू मुलाणी यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कष्टांचे, धाडसी कार्याचे आणि खाकी वर्दीप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस उज्ज्वल यश लाभो, हीच शुभेच्छा!





















