Thu, Apr 2, 2026
अध्यात्म

‘जोतिबाच्या नावाने चांगभल’च्या जयघोषात पाडळीच्या मानाच्या पहिल्या सासनकाठीचे कोल्हापूरकडे प्रस्थान!

‘जोतिबाच्या नावाने चांगभल’च्या जयघोषात पाडळीच्या मानाच्या पहिल्या सासनकाठीचे कोल्हापूरकडे प्रस्थान!
Ashok Ithape
  • PublishedMarch 30, 2026

भक्तिमय वातावरण, गुलालाची उधळण; देवस्थान विकासासाठी ४.३५ कोटींचा निधी मंजूर

भुईंज l महेंद्रआबा जाधव – दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेतील अढळ मान असलेल्या निनाम-पाडळी (ता. सातारा) गावच्या पहिल्या मानाच्या सासनकाठीचे रविवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात कोल्हापूरकडे प्रस्थान झाले. ‘जोतिबाच्या नावाने चांगभल’च्या गजरात आणि हलगीच्या कडकडाटात संपूर्ण पाडळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांची प्रचंड गर्दी यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याप्रसंगी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि नागठाणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अजित साळुंखे (सर) यांच्या हस्ते सासनकाठीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार श्रीनिवास ढाणे, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, पाडळी गावास ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळ’ योजनेतून ‘ब’ वर्ग देवस्थानचा दर्जा प्राप्त झाला आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नांतून देवस्थानच्या विकासासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

“पाडळीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” अशी ग्वाही यावेळी आमदारांनी दिली. तर अजित साळुंखे यांनीही देवस्थानच्या नियोजनबद्ध विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या प्रस्थान सोहळ्यावेळी मंडल अधिकारी रमेश ढाणे, भोसले साहेब (PSI), कारळे साहेब (PSI), सरपंच संजय ढाणे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र ढाणे, ज्योतिर्लिंग देव ट्रस्टचे चेअरमन संजय कुंभार, तसेच पी. वाय. ढाणे सर, बाळासाहेब ढाणे, राजेंद्र माने, दिलीप ढाणे (बापू), सागर ढाणे, सुशांत ढाणे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाडळीच्या मानाच्या सासनकाठीचा हा सोहळा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानला जातो. भक्ती, परंपरा आणि विकास यांचा संगम साधणारा हा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!