Thu, Apr 2, 2026
सामाजिक

बाेपेगाव ग्रामपंचायतीस गरवारे कंपनीकडून पर्यावरण पूरक घंटागाडी प्रदान

बाेपेगाव ग्रामपंचायतीस गरवारे कंपनीकडून पर्यावरण पूरक घंटागाडी प्रदान
Ashok Ithape
  • PublishedMarch 28, 2026

वाई, दि. २८ : गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून बाेपेगाव ग्रामपंचायतीस पर्यावरण पूरक कचरा संकलन घंटागाडी प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी राजेंद्र शिवरायकर, व्हाईस प्रेसिडेंट अभिजीत जोशी, व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, एच. आर. प्रमुख युवराज थोरात, असो. व्हाईस प्रेसिडेंट विवेक देशपांडे, युवा नेते क्षितिज नितीन पाटील, सरपंच सुदाम जाधव, उपसरपंच नारायण शिंदे, बाेपेगाव सेवा सोसायटीचे सचिव विठ्ठल शिंदे तसेच ग्रामविकास अधिकारी रामदास निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विवेक कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना कंपनीच्या सामाजिक बांधिलकीची माहिती दिली. ते म्हणाले की, गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे वाई तालुक्यातील गावांशी अनेक वर्षांचे अतूट नाते आहे. CSR उपक्रमांतर्गत कंपनीकडून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रांत विविध कामे राबविण्यात येत आहेत. शाळांमध्ये वॉटर आरओ प्लांट, डिजिटल क्लासरूम, मुलींसाठी सायकली, वेंडिंग मशीन देण्यात आली आहेत. तसेच वाई नगर परिषदेस अग्निशमन वाहन, वाई बसस्थानकात महाबळेश्वरच्या प्रवाशांसाठी पिकअप शेड, गरवारे हाफ मॅरेथॉनचे प्रायोजकत्व आणि भगवा कट्टा प्रतिष्ठानला अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

याशिवाय, गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून तरुण-तरुणींना विविध व्यावसायिक कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून, गेल्या दोन वर्षांत ८०० हून अधिक युवक-युवतींनी याचा लाभ घेतला आहे. त्यापैकी ४०० पेक्षा अधिक जणांनी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबन साधले आहे. महिलांसाठी फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, तसेच सीएनसी मशीन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, डिजिटल लिटरेसी, शेळीपालन, मधमाशीपालन यांसारखे शेतीपूरक कोर्सेस उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतीस घंटागाडी प्रदान करताना आम्हाला आनंद होत असून, यामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी या सुविधेचा योग्य वापर करून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामदैवत जानूबाई मंदिरात पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वाहन पूजन व श्रीफळ वाढविण्यात आले. ग्रामस्थांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

विठ्ठल शिंदे यांनी प्रास्ताविकात गरवारे कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, गरवारे कंपनी ही वाई तालुका आणि सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असून, कंपनीने रोजगारासोबत सामाजिक दायित्वही प्रभावीपणे पार पाडले आहे.
यावेळी विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते पर्यावरणपूरक घंटागाडीची चावी क्षितीज पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल शिंदे यांनी केले. सरपंच सुदाम जाधव, चंद्रकांत जाधव, प्रथमेश जाधव, नारायण शिंदे, संपत जाधव, आरती तर्डे, महेश शिंदे, पोपट जाधव, तानाजी जाधव यांनी स्वागत केले. ग्रामसेवक रामदास निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनशुमन जगदाळे, गजानन जाधव, सुनिल पानसे, अविनाश भोसले, महादेव ससे, गुलाब बोर्से, आकाश धनवे, कुणाल जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

फाेटाे ओळी : क्षितीज पाटील यांना घंटागाडीची चावी प्रदान करताना विवेक कुलकर्णी व इतर मान्यवर.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!