Thu, Apr 2, 2026
शिक्षण

उडतरे येथील बाळासाहेब पवार हायस्कूलचा दहावीचा शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न

उडतरे येथील बाळासाहेब पवार हायस्कूलचा दहावीचा शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 27, 2026

विद्यार्थ्यांना कृषी व आयटीआय क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन • निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू

पाचवड l प्रतिनिधी : वाई तालुक्यातील उडतरे येथील बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी कृषी तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते अरुण अदलिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर आयटीआय सातारा येथील निदेशक प्रा. चिंतामणी काटवटे अध्यक्षस्थानी होते. तसेच उपनिदेशक धनंजय हेंद्रे यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पुजारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर मुख्याध्यापक दादासाहेब बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुणे अरुण अदलिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळा आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “मुलांनी नाचण्याकडून वाचण्याकडे वळावे, तसेच कृषी क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा,” असे सांगत त्यांनी देशप्रेम व संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

अध्यक्ष प्रा. चिंतामणी काटवटे यांनी आयटीआयमधील नवीन अभ्यासक्रम व रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली बाबर हिने केले, तर स्वागत कु. अंकिता पवार हिने केले. साईराज खरात याने आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला व शिक्षकांसोबत फोटोशूट करून आठवणी जपल्या. निरोप घेताना काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या डोळ्यांत भावनिक अश्रू दिसून आले.

फोटो ओळ : उडतरे (ता. वाई) येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी बाळासाहेब पवार हायस्कूलला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देताना दादासाहेब बनसोडे, अरुण अदलिंगे, चिंतामणी काटवटे, धनंजय हेंद्रे, शंकर दगडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!