किसन वीर महाविद्यालयात ‘टेक फेस्ट’चा जल्लोष; तंत्रज्ञानाच्या संगमातून विद्यार्थ्यांना नवी दिशा
![]()
बी.सी.ए विभागाचा उपक्रम उत्साहात पार; तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धांमधून कौशल्यांना मिळाला वाव
वाई | प्रतिनिधी : येथील किसन वीर महाविद्यालयाच्या बी.सी.ए विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘टेक फेस्ट’ कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. भोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत व्याख्याते श्री. मंदार काळे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. परदेशातील उच्च पगाराची नोकरी सोडून मातृभूमीत परत येत साताऱ्यात स्वतःची आय.टी. कंपनी उभारणारे काळे हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करत सातत्य, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग तज्ञ श्री. मंदार काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूक्ष्म निरीक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नवकल्पनांचा स्वीकार यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच AI आणि ML क्षेत्रातील विविध करिअर संधींची माहिती देत विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, बी.सी.ए समन्वयक प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे, विभागप्रमुख श्रीमती अर्चना कदम यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘टेक फेस्ट’ अंतर्गत प्रश्नमंजुषा, C/C++ प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट व PPT सादरीकरण, गेमिंग (Free Fire, BGMI), ट्रेझर हंट आणि पोस्टर प्रेझेंटेशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची आणि नवकल्पनांना वाव देण्याची संधी मिळाली.
स्पर्धेतील विजेत्यांना युवा उद्योजक अविनाश जाधव यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी चॅम्पियनशीप ट्रॉफी पटकावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती रेश्माबानो मुलाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती कोमल चौधरी यांनी केले.
बी.सी.ए विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा ‘टेक फेस्ट’ यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल ओळख निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.













