सातारा जिल्हा परिषद अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता; विभागनिहाय तरतुदी जाहीर
सातारा, दि. 18 : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम, 1966 मधील नियम क्र. 137 नुसार अंदाजपत्रक मंजुरीची मुदत निश्चित असली तरी, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड दि. 20 मार्च 2026 रोजी होत असल्याने सर्वसाधारण सभेसाठी आवश्यक कालावधी उपलब्ध न झाल्याने सन 2026-27 च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सन 2026-27 साठी अपेक्षित महसुली उत्पन्न 4541.00 लक्ष व भांडवली उत्पन्न 1892.00 लक्ष रुपये गृहीत धरून महसुली खर्च 4540.00 लक्ष व भांडवली खर्च 1892.00 लक्ष रुपये असा संतुलित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सन 2025-26 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक महसुली 11312.67 लक्ष व भांडवली 2092.00 लक्ष रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
विभागनिहाय तरतूद (रु. लाखात)
मानधन : 80.00
सामान्य प्रशासन : 150.00
शिक्षण विभाग : 180.00
शिक्षण (५% देखभाल व दुरुस्ती) : 81.00
बांधकाम विभाग : 800.00
लघुपाटबंधारे विभाग : 40.00
आयुर्वेद : 20.00
आरोग्य विभाग : 140.00
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी : 50.00
कृषि विभाग : 110.00
पशुसंवर्धन विभाग : 54.00 (विविध योजनांसाठी)
वने विभाग : 2.00
समाजकल्याण विभाग : 298.86 पेक्षा अधिक तरतूद
महिला व बालकल्याण विभाग : 145.00 पेक्षा अधिक तरतूद
इतर (ग्रामपंचायत/आपत्कालीन/अनुदाने) : 1488.49
प्रमुख तरतुदी – बांधकाम विभागांतर्गत पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, सुरक्षा व्यवस्था, विश्रामगृह दुरुस्ती तसेच ग्रामीण रस्ते व इमारत कामांसाठी निधी देण्यात आला आहे.
आरोग्य विभागात औषध पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व पालखी सोहळ्यासाठी निधी राखीव आहे.
कृषि विभागातून शेतकऱ्यांना साहित्य, यांत्रिकीकरण व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिले जाणार आहे.
समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग, महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे.
हे अंदाजपत्रक नव्याने स्थापन होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपुढे अवलोकनार्थ सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.













