महालक्ष्मीच्या चरणी सूर्योदयाचा ‘किरणाभिषेक’; भुईंजमध्ये निसर्ग-भक्तीचा अद्भुत सोहळा
![]()
सूर्यकिरणांचा गाभाऱ्यात प्रवेश; स्थापत्यशास्त्र आणि श्रद्धेचा अद्भुत संगम, तीन दिवस भाविकांची मोठी गर्दी

भुईंज : वाई तालुक्यातील भुईंज येथे असलेल्या श्री महालक्ष्मी देवी मंदिरात मंगळवार, १७ मार्च २०२६ पासून ‘किरणोत्सव’ सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. वर्षातून केवळ एकदाच अनुभवता येणारा हा अलौकिक सोहळा निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम साकारत भाविकांना आध्यात्मिक आनंद देत आहे.
आज पहाटे मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. शिवराज जंगम यांच्या हस्ते तसेच बंडू गुरव, प्रसाद गुरव व संदीप सातपुते यांच्या पौरहित्याखाली महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी अचूक ६ वाजून ५९ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करत प्रथम देवीच्या चरणांना स्पर्श केला आणि नंतर हळूहळू मस्तकावर ‘किरणाभिषेक’ झाला. हे दृश्य पाहताच भाविकांच्या मुखातून ‘हरं बोला हरं’चा जयघोष घुमला.

हा किरणोत्सव केवळ धार्मिक परंपरा नसून, प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना मानला जातो. मंदिराची रचना अशा अचूक पद्धतीने करण्यात आली आहे की, ठराविक दिवशी सूर्योदयाचे किरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. यामुळे आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रचिती येते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही १७ ते १९ मार्च या कालावधीत हा सोहळा साजरा होत असून, दररोज सकाळी साडेसहा वाजल्यापासून किरणांचे दर्शन सुरू होते. या ‘सुवर्ण किरणोत्सवा’चा अनुभव घेण्यासाठी भुईंजसह सातारा जिल्हा आणि राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
मंदिर प्रशासन व ट्रस्टच्या वतीने भाविकांना पुढील दोन दिवस या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाच्या प्रकाशातून साकारलेले देवीचे हे मोहक रूप प्रत्येक भक्तासाठी अविस्मरणीय ठरत आहे.













