जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी उद्योजिका शितल पिसाळ यांचा शिवकृपा पतपेढीकडून सन्मान
![]()
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर उभारलेल्या उद्योगाची दखल; वाई शाखेत महिला दिनी गौरव सोहळा
वाई l प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबईच्या वाई शाखेच्या वतीने राज्य शासनाचा “यशस्वी उद्योजक” हा मानाचा पुरस्कार प्राप्त उद्योजिका श्रीमती शितल पिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
वाई तालुक्यातील ओझर्डे गावच्या सासरवाशीण आणि पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील माहेर असलेल्या शितल पिसाळ या वाई शहरातील “भक्ती वुलन हाऊस” च्या मालकीन आहेत. अवघ्या एका हँड मशीनच्या साहाय्याने त्यांनी सुमारे १७ वर्षांपूर्वी ओझर्डे सारख्या छोट्या गावातून स्वेटर विणकाम व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला गावपातळीवर विक्री होत असलेल्या या उत्पादनांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्याने व्यवसायाची मागणी वाढत गेली.
यानंतर त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक स्वेटर विणकाम यंत्रसामग्री खरेदी केली आणि वाई शहरात गाळा भाड्याने घेऊन “भक्ती वुलन हाऊस” या नावाने व्यवसाय अधिक विस्तारला. राज्यातील विविध कृषी प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावून त्यांनी आपल्या उत्पादनांची प्रभावी मांडणी केली. अल्पावधीतच सातारा जिल्ह्यासह राज्यभरात त्या एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
त्यांच्या उद्योगातील गुणवत्ता आणि यशाची दखल घेत राज्याच्या खादी व ग्रामोद्योग महामंडळाने उत्कृष्ट उद्योजिकेचा प्रस्ताव उद्योग मंत्रालयाकडे पाठविला. त्यानंतर राज्य शासनाने त्यांना “यशस्वी उद्योजक” पुरस्काराने गौरविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कारही प्राप्त झाला असून विविध सामाजिक संस्थांकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. वाई पोलिस स्टेशनच्या वतीनेही जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
शिवकृपा सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष गोरख तुकाराम चव्हाण आणि संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत श्री. वंजारी यांनी सुमारे ४३ वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने शिवकृपा पतपेढीची स्थापना केली. आज या पतपेढीचे सुमारे ६ कोटी रुपयांचे भागभांडवल असून राज्यभरात जवळपास १०२ शाखा कार्यरत आहेत. अनेक गरजू नागरिकांना आर्थिक मदत करून उद्योग उभारण्यास पतपेढीने मोठे योगदान दिले आहे.
महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने शिवकृपा पतपेढीमार्फत दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व १०२ शाखांमध्ये महिला सन्मान कार्यक्रम आयोजित केला जातो.
वाई शाखेतील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक मनोज पवार, सहाय्यक शाखाधिकारी अंकुश पोळ, सहाय्यक अधिकारी विनोद जांभळे, मयूर चोरट, आकाश पवार, प्राजक्ता पवार, नचिकेत राऊत, सामाजिक कार्यकर्ते हणमंत ढवळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या, पोलिस अधिकारी तसेच बँकिंग आणि उद्योजक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.













