उंब्रज परिसरात वनविभागाची धडक कारवाई; अवैध साग-रायवळ लाकूडसाठा जप्त
![]()
चार ठिकाणी धाडी; ९८.४४९ घनमीटर साग-रायवळ लाकूड आणि जळाऊ मालासह २५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
सातारा l प्रतिनिधी : सातारा वनविभागाने अवैधरित्या साठवून ठेवलेल्या साग व रायवळ प्रजातीच्या लाकूडमालावर धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कराड तालुक्यातील उंब्रज परिसरातील चार ठिकाणी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध लाकूडसाठा आढळून आला असून या प्रकरणी चार वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मौजे उंब्रज (ता. कराड, जि. सातारा) व परिसरातील गावांमध्ये कोणताही कायदेशीर परवाना नसताना साग व रायवळ प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करून मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती सातारा वनविभागाच्या दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार ७ व ८ मार्च २०२६ रोजी वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा तसेच कराड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या संयुक्त पथकाने उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे व कोर्टी या चार ठिकाणी अचानक धाड टाकली.
या कारवाईदरम्यान चारही ठिकाणांहून एकूण ९८.४४९ घनमीटर इतका साग व रायवळ प्रजातीचा १,२८३ अनगड नगांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच कळंत्रेवाडी व शिवडे येथून ६१.२७५ घनमीटर जळाऊ लाकूड देखील जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साग व रायवळ लाकडाची किंमत २५ लाख २७ हजार ८७२ रुपये, तर जळाऊ लाकडाची किंमत ७९ हजार १०३ रुपये इतकी असल्याचे वनविभागाने सांगितले.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१ (२)(ब) अन्वये वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांनी तीन वनगुन्हे, तर कराड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एक वनगुन्हा नोंद केला आहे. हा लाकूडसाठा कोठून आणण्यात आला आणि कुठे नेण्याचा उद्देश होता याचा पुढील तपास कराड वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे यांच्या सहकार्याने करण्यात आली. या मोहिमेत वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल डी.डी. बोडके, आनंद जगताप तसेच वनरक्षक व फिरते पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
दरम्यान, अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा असून अशा प्रकरणात एक वर्षापर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहावे तसेच वनगुन्ह्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.













