गरवारे टेक्निकल फायबर्सतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात ११०० हून अधिक महिलांचा सहभाग
वाई, दि. ९ : वाई येथील गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कंपनीतील ११०० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. औद्योगिक वसाहतीतील सुशिला मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्रेसिडेंट विवेक
कुलकर्णी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रमेश गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थोरात यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजनाने करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या अपूर्वा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, जागतिक महिला दिन हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा, आत्मसन्मानाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा दिवस आहे. आजची स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नसून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीची मुख्य शक्ती बनली आहे. आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या नात्यांमधून ती प्रेम, संस्कार आणि जबाबदारीचे मूल्य समाजात रुजवते.
त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या काळात महिला उद्योग, शिक्षण, विज्ञान, प्रशासन आणि व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला कार्यरत असून जवळपास ११०० पेक्षा अधिक महिला आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने कंपनीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे कंपनीचे उत्पादन जागतिक बाजारपेठेत पोहोचले असून ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. घर आणि नोकरी अशा दुहेरी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत या महिला आपल्या कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक बळ बनल्या आहेत.
यावेळी अध्यक्षीय भाषणात विवेक कुलकर्णी म्हणाले की, समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत करण्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला आणि उद्योग-व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आज यशाची पताका फडकवत आहेत. महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना समान हक्क व समान संधी देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, महिला या केवळ घराच्या चौकटीत मर्यादित नसून समाज घडविणाऱ्या शिक्षिका, जीव वाचविणाऱ्या डॉक्टर, नवनवीन संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ, दूरदृष्टी असलेल्या नेत्या आणि सक्षम उद्योजिका म्हणून समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत. महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची खरी ओळख असून याच सामाजिक बांधिलकीतून गरवारे कंपनीतर्फे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आणि आरोग्य या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
युवराज थोरात यांनी प्रास्ताविकात कंपनीतर्फे वर्षभर महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात हळदी-कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या तीन महिलांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्या महिलांनी वर्षभारमध्ये जास्त कामाचे दिवस भरले आहेत, त्या महिलांचा ही भेटवस्तू देऊन गाैरवकरण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिलांना कंपनीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय कल्याणी दुधाने व धनश्री ढगे यांनी केले. जनरल मॅनेजर युवराज थोरात यांनी प्रास्ताविक केले तर जनरल मॅनेजर सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले.
यावेळी कंपनीचे अधिकारी सचिन कुलकर्णी, बलजीतसिंग सैनी, चंद्रशेखर बदाने, प्रशांत कुलकर्णी, कामगार संघटनेचे सेक्रेटरी अर्जुन सावंत यांच्यासह अधिकारीवृंद आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.













