पुणे – बेंगलोर महामार्गावरील २० लाखांच्या दरोड्याप्रकरणी केरळमधील ७ आरोपींना अटक
![]()
भुईंज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, महामार्गावरील दरोड्याचा २४ तासांत छडा
वाई, १९ जुलै २०२५ : पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ वर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच घडलेल्या २० लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी सातारा व भुईंज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी केरळ राज्यातील सात दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण ३५ लाख २६ हजार ९९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी:
राष्ट्रीय महामार्गावर परराज्यातील टोळीने घातलेला दरोडा अवघ्या काही तासांत उघडकीस आणण्यात सातारा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत ७ मुख्य आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात चोरलेली सर्व मालमत्ता आणि वाहने हस्तगत केली आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही धाडसी कारवाई केली. या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी सहभागी सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेचा तपशील: १२ जुलै २०२५ रोजी पहाटे २.४५ ते ३.४५ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात इसमांनी इनोव्हा, स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट कारचा वापर करून विशाल पोपट हासबे यांच्या हुंडाई व्हेन्यू कारला अडवले. लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडून, गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवून कारमधील २० लाख रुपये रोख रक्कम चोरून गाडीसह चालकाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर चालक (तक्रारदार) आणि गाडीला सर्जापूर फाटा, ता. जावली येथे सोडून दरोडेखोर पळून गेले होते. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २२०/२०२५ भा.न्या.सं.क. १२६ (२), ३११, १४० (२) नोंद करण्यात आला होता.
पोलिसांची तत्पर कारवाई: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, श्री. बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर आणि भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना आरोपींचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स.पो.नि. रोहित फाणें (स्था.गु.शा.) आणि पो.उ.नि. पतंग पाटील (भुईंज पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नाकाबंदीचे आदेश देण्यात आले.
आरोपींचा शोध आणि अटक: गुन्हा केलेली इनोव्हा, स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट ही वाहने सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव बाजूने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सांगली पोलिसांना ही माहिती कळवताच, त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने योगेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली येथे मुख्य आरोपी विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण याला अटक केली. त्यानंतर तपास पथक अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी केरळ राज्याकडे रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण आणि पारंपरिक कौशल्यपूर्ण तपास तंत्राचा वापर करून पोलिसांनी गुन्ह्यातील इतर आरोपी आणि वापरलेल्या वाहनांची माहिती मिळवली. केरळ पोलिसांच्या मदतीने गुन्हा करून पळून गेलेले केरळ राज्यातील इतर सहा आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ (क्रमांक के. एल.१० ए.जी. ७२००) वायनाड, केरळ येथून ताब्यात घेण्यात आली. तसेच, कराड शहर पोलीस ठाण्याकडील पथकाने केरळ येथे जाऊन गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार (क्रमांक के.एल. ६४ एम २७९७) ताब्यात घेतली.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी: स.पो.नि. श्री. रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात, मुख्य आरोपी विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण याच्याकडून चोरीस गेलेली २० लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. एकूण ३५ लाख २७ हजार ५९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींवर केरळ, मध्यप्रदेश, तमिळनाडू आणि दिल्ली राज्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, चोरी, अपहरण आणि मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अटक आरोपींची नावे: १. विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण (वय ३०, रा. ओलिओपारा, नालेपल्ली, जि. पलक्कड, केरळ)
२. नंदकुमार नारायणस्वामी (वय ३२, रा. चिथीरा हाऊस, जयराम कॉलनी, चिराक्कड, पोस्ट-कुम्मातुरमेदु, जि. पलक्कड, केरळ)
३. अजिथ कुमार (वय २७, रा. कांजिकुलम हाऊस, मराथुरोड, कनिकुलम, पोस्ट- काल्लेपुल्ली, जि. पलक्कड, केरळ)
४. सुरेश केसावन (वय ४७, रा. पलनाम, कुरीस्सी, पोलपुल्ली, पंचायत, पोस्ट-वेरकोल्ली, जि. पलक्कड)
५. विष्णु क्रिशनंकुट्टी (वय २९, रा. उषानिवास, सुर्यनकॉलनी, कारेक्कटूपरांम्बु, पोस्ट-अंबिकापुरम, जि. पलक्कड)
६. जिनु राघवन (वय ३१, रा. कांजिरक्कडवु, पोस्ट-मलांबुझा, जि. पलक्कड)
७. कलाधरण श्रीधरण (वय ३३, रा. चिनीकुलांबू, पोस्ट-वावुल्यापूरम, अलथूर थोनिप्पाडम, जि. पलक्कड)या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग होता. परराज्यातील दरोडेखोरांनी महामार्गावर केलेला दरोड्याचा गुन्हा काही तासांत उघड करून २४ तासांच्या आत सात महत्त्वाच्या आरोपींना अटक करून चोरीस गेलेली सर्व मालमत्ता व वाहने हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.













