ज्ञानतपस्वी कल्पना आयरन यांचा शनिवारी प्रथम स्मृतिदिन
सातारा / प्रतिनिधी : येथील नर्मदा एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. जे. डब्ल्यू. आयरन अकॅडमीच्या माजी प्राचार्या श्रीमती कल्पना आयरन यांचा शनिवार, दि. सात जून रोजी प्रथम स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंदाकडून अभिवादन करण्यात येत आहे.
साताऱ्यातील जुन्या पिढीतील पहिलीच इंग्रजी माध्यमाची शाळा अशी ओळख असलेल्या नर्मदा स्कूलची स्थापना डॉ. जे. डब्ल्यू. आयरन यांनी सन 1970 मध्ये केली.
कल्पना आयरन या डॉ. आयरन यांच्या कन्या होत. आपल्या वडिलांनी स्थापलेल्या या ज्ञानमंदिराच्या प्रगतीमध्ये त्यांनी बहुमोल योगदान दिले. त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून या विद्यालयामध्ये अध्यापन केले. स्कूलच्या गुणवत्ता वाढीसाठी त्या सतत आग्रही असत. शैक्षणिक आणि क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नर्मदा स्कूलचे विद्यार्थी चमकावेत, यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम निश्चितच अनमोल आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणूनच विद्यालयातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणि मैदानी व बौद्धिक स्पर्धांमध्ये चमकले आहेत.
स्कूलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी बजावलेले कर्तव्य आणि सांभाळलेली जबाबदारी खऱ्या अर्थाने विद्यालयाच्या प्रगतीमधील ‘माईल स्टोन’ आहे.
नर्मदा एज्युकेशन सोसायटी पुढे भारती विद्यापीठांमध्ये विलीन झाली, तरीही विद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात आणि शैक्षणिक वाटचालीसाठी कल्पना आयरन मॅडम या सातत्याने प्रयत्नशील असत. सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरीनेच विद्यार्थी व पालकांसमवेत त्यांचा जिव्हाळा, स्नेह अखंडितपणे टिकून होता.
आदर्श शिक्षिका, कर्तव्यदक्ष प्राचार्य, शिस्तबद्ध प्रशासक आणि मातृहृदयी व्यक्तिमत्व असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बहुविध पैलू होते. प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस विद्यार्थी, शिक्षक यांचेकडून वंदन व स्मृतींना उजाळा दिला जात आहे.













