दसवडी येथे श्री सेवागिरी महाराज मंदिराचा सातवा वर्धापनदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार संपन्न. .
![]()
धोम धरणाच्या अथांग निळाशार जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
वाई : प.पूज्य श्री सेवागिरी महाराज मंदिराचा सातवा वर्धापनदिन भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे दसवडी येथे सालाबाद प्रमाणे मोठ्या भक्ती भावाने होणारा सातवा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी महान तपस्वी कुंभमेळा समिती राष्ट्रीय अध्यक्ष प.पूज्य महंत श्री रामनारायणदास जी यांची प्रार्थनीय उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद, सिख महासभा परिषद उपाध्यक्ष तथा काशी विद्वत परिषद प्रभारी विश्वगुरू हभप श्री नामदेव महाराज हरड यांच्या विचारधारेतून हा धार्मिक कार्यक्रम संपन्न होईल.

प्रत्येक वर्षी ज्यांच्या अधिपत्याखाली धार्मिक आधारस्तंभ प.पूज्य १०८ श्रीमहंत मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज तीर्थक्षेत्र पुसेगाव(खटाव- सातारा) यांच्या आशीर्वाद वचननाम व मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. या मंदिर वर्धापन कार्यक्रमास प्रमुख उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.श्री मकरंदजी आबा पाटील. (मदत व पुनर्वसन विकास मंत्री महाराष्ट्र) त्याचबरोबर श्री.नितीन काका पाटील(नवनिर्वाचित राज्यसभा खासदार) श्री. राजेंद्र आप्पा शेलार (सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,व संत साहित्याचे गाढे अभ्यासक,व्याख्याते) या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या नैसर्गिक निसर्गरम्य व ऐतिहासिक भूमीत पवित्र कृष्णामाईच्या परिसरात महान होऊन गेलेले पांडवकालीन तपस्वी धौम्य ऋषी (धोम तीर्थक्षेत्र) आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्रभूमी मध्ये होत आहे. बाल शिवाजीराजे व मावळ्यांबरोबर हिंदवी स्वराज्यची शपथ घेऊन शंभो महादेवाला रक्ताभिषेक घातलेल्या किल्ले रायरेश्वर या ऐतिहासिक भूमीत आणि कृष्णानदीच्या पावनमय भूमी परिसरात होत आहे.
धोम धरणाच्या अथांग निळाशार जलाशयाच्या विभोलिन निसर्गरम्य परिसरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दसवडी येथील मंदिराचा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांढरदेव आई काळेश्वरीचे मंदिर समोर डोंगरावरच दृष्टीस पडते. प्राचीन पुरातन तीर्थक्षेत्र महाबळेश्वर,आणि थंड हवेच्या पांचगणीच्या कुशीत वसलेला हा सर्व परिसर आहे. ब्रह्मलीन कृपेने लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प.पूज्य श्री सेवागिरी महाराज मंदिर निर्मित होऊन भाविकांना दर्शन व अनुभूती घडून येत असते. श्री सेवागिरी मंदिराचा कलशारोहन व जीर्णोद्धार सोहळा २०१८ मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होऊन गेला.
सोहळ्यास करवीर नगरी (कोल्हापूर) श्री.जगतगुरु शंकराचार्य यांच्या आशीर्वादाने व शुभहस्ते संपन्न झाला होता. पवित्र कृष्णा नदीच्या तीरावर छोटस दसवडी गाव पूर्वपार वसलेले आहे. प्राचीन सांस्कृतिक वारसा वाईच्या या विराटनगरी वैभवशाली संस्कृती,आणि ऐतिहासिक समृद्ध वारसा जपलेली तप भूमी आहे. या पावन भूमीमध्ये जवळच एक आधुनिक तीर्थक्षेत्र प.पूज्य सेवागिरी मंदिराचा सातवा वर्धापन दिन दि.२१.मे ते २२ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे.याच मंदिराचे शिवधनुष्य उभारणीचे काम २०११ पासून सर्वश्री श्री.आनंदशेठ फणसे यांनी केले आहे. मंदिर उभारणीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहे.
सातवा वर्धापन दिना कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन व नियोजन प्रत्येक वर्षी करत असतात. एक व्यक्ती भव्यदिव्य मंदिर निर्मिती करू शकते याचा आदर्श त्यांनी सर्वांपुढे ठेवला आहे. परंतु ध्येयवादी धार्मिक क्षेत्रात कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करीत असतात. त्याचेच मूर्तीमंत उदाहरण श्री आनंदशेठ यांचे द्यावे लागेल. वर्षभर होणारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करीत असतात. जागतिक पर्यावरण सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी दुर्मिळ वृक्ष मंदिर परिसरात लावून परिपूर्ण वृक्षांची वाढ केली आहे. आणि पर्यावरण जनजागृती बरोबर सामाजिककार्य व धार्मिक करीत आहेत. ही त्यांच्या माता-पिता व पूर्वजांची पुण्याई आहे. मंदिरामध्ये लग्न सोहळ्यासाठी अल्प दरात सोय करून दिली आहे. गोरगरिबांचे अनेक विवाह सोहळे धुमधडाक्यात मंदिरात संपन्न होत असतात. त्याचा लाभ पंचक्रोशी मध्ये लोक घेत आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केलेले असते. वर्धापनदिन कार्यक्रमात भक्तीमय वातावरणात भाविकांना लाभ व दर्शन मिळत असते. पंचक्रोशीतील वारकरी दर वर्षी मंदिरातून पंढरपूरला पायी दिंडी सोहळा आयोजित करत असतात. यावर्षी २१ मे,२०२५ रोजी प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा होऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल. 21 मे रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजता हभप श्री विठ्ठल महाराज कंदारे (ज्ञानाई गुरुकुल अकलूज-सोलापूर) यांचा सुमधुर हरिपाठ होईल. सहा ते सात सायंकाळी कृष्णाई महिला भजन मंडळ गंगापुरी वाई यांचे सुमधुर भक्तीमय भजनाचा कार्यक्रम होईल. यानंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल. आठ वाजता श्रीची महाआरती आणि ओम नमो नारायण श्री सेवागिरी नाथाय नमः या महामंत्राचा पुष्प जप, हा कार्यक्रम होईल.२२ मे २०२५ रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. सकाळी सात वाजता काकड आरती होईल. सकाळी सात ते साडेसात मंदिरात श्री सेवागिरी महाराजांची मंगल आरती होईल. गावात प्रत्येक घरासमोर व सार्वजनिक रस्त्यावर आणि मंदिरा सभोवती सुबक रांगोळी काढली जाते. सकाळी साडेनऊ वाजता श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची व पादुकांची रथा मधून ग्राम प्रदर्शना भव्य मिरवणूक होत असते. शंखनाद व प्रसिद्ध तुतारींच्या आवाज मिरवणुकीत मुख्य आकर्षण असते प.पूज्य महंतजी कुंभमेळा राष्ट्रीय अध्यक्ष रामनारायणदास जी, प.पूज्य महंत 108 मठाधिपती सुंदरगिरी महाराज, विश्वगुरू नामदेव महाराज हरड यांचे आगमन होऊन रथामध्ये विराजमान होतील. टाळ मृदंग,ढोल,ताशे,तुतारी यांच्या गजरात मिरवणुकीची शोभा वाढत जाते.
वारकरी व गुरुकुल शिष्य अकलूज यांच्या टाळ मृदुंग आवाजात मोठ्या भक्तीपरमार्थाने मिरवणुकीचे भक्तीमय वातावरण होऊन भाविक मंत्रमुग्ध होऊन जातात. ग्रामदैवतेची श्री चौनेश्वर मंदिराजवळ पूजा, अर्चा विधी होऊन पुढील लक्ष्मी आईच्या मंदिराकडे गावातून प्रदक्षिणा केली जाते. सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यक्रमात भाग घेत असतात. पंचक्रोशीतील भजन मंडळे मुख्य आकर्षण असते. वाई तालुका वारकरी संघटना, कृष्णामाई व कमंडलू वारकरी संघटना पश्चिम भाग, न्यू सातारा वारकरी समूह, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक निघत असते. या भक्तीच्या महासागरात भक्तजन तल्लीन होत असतात.
लक्ष्मीच्या मंदिराचे पूजा- विधी करून पुन्हा श्री सेवागिरी महाराज मंदिराकडे परतीच्या मार्गावर मिरवणूक निघत असते. फटाक्यांची आतषबाजी, महिलांचे मंगळगौर गीते, भजन ओव्या, फुगडी यांचे खास वारकरी भक्ती परंपरेचे दर्शन घडवले जाते. मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर ११ ते १२ मंदिरात महाअभिषेक, महापूजा, होम, आरती, मंत्र पुष्पांजली, पुष्पवृष्टी कार्यक्रम होऊन दर्शन सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य व्यासपीठावर प.पूज्य महंत 108 मताधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांचे प्रबोधनकारक प्रवचन होईल. विश्वगुरू हभप श्री नामदेव महाराज हरड यांचे विश्व हिंदू जनजागृती विषयक प्रवचन होईल. शेवटी कुंभमेळावा राष्ट्रीय अध्यक्ष प.पूज्य श्री रामनारायणदास जी यांचे धर्मज्ञानी प्रबोधनकार प्रवचन होईल. दुपारी पंचकोशी मधील भजन मंडळाचे सुमधुर भजने सभा मंडपात होतील. दुपारी दीड ते अडीच महाप्रसादाचा भक्त जणांना आस्वाद घेता येईल. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ होईल. साडेसहा ते सात महारती होईल. सायंकाळी सात ते नऊ वा.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप श्री विठ्ठल बोवा शेळके महाराज (संस्थापक अध्यक्ष वारकरी परिषद शेगाव जिल्हा बुलढाणा) यांचे समाजप्रबोधनकारक कीर्तन होईल. त्यांना साथ पंचक्रोशीतील भजनी मंडळ देतील. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा.
मंदिराची पूजा पाठ व सेवा करणारे श्री सुदर्शन महाराज, श्री कल्पेश मनियार महाराज, श्री सेवागिरी महाराज ट्रस्ट पुसेगाव, ग्रामस्थ मंडळ दसवडी, श्री चौणेश्वर युवा मंडळ दसवडी,संपूर्ण वाई तालुका भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ यांची यांची अतुलनीय साथ प्रत्येक वेळी लाभत असून सेवागिरी भक्तगणांचे आशीर्वाद अत्यंत मोलाचे आहेत.
लेखन: श्री तानाजी बापू फणसे. पर्यावरण संरक्षक, नवी मुंबई व दसवडी.













