“सुनहरी शाम रफीसाहब के नाम” कार्यक्रमाला वाईकर रसिकांची भरभरून दाद
वाई : भारतीय सिनेसृष्टीतील महान गायक पद्मश्री महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी निमित्त रफीसाहेब फॅन्स क्लब, वाई आणि जल्लोष परिवाराच्या वतीने आयोजित “सुनहरी शाम रफीसाहब के नाम” कार्यक्रमात रफी साहेबांच्या गीतांना वाईकर रसिकांची भरभरून दाद मिळाली. लोकमान्य टिळक ग्रंथालयातील रमेश गरवारे सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात गायक अशोक येवले आणि गायिका ललिता जगदाळे यांनी रफी साहेबांची सुरेल गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
निवेदिका तनुजा इनामदार यांनी निवेदनाच्या माध्यमातून रफीसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. पुकारता चला हु मै, वादा करले साजना, ये रेशमी जुल्फे, दिवाना हुआ बादल, मैंने पूछा चाँद से, मेरे मितवा, सुहानी रात ढल चुकी, झिल मिल सितारों का, तुम जो मिल गये हो, तेरी बिंदिया रे, शोधिसी मानवा, तेरी गलियो मे, मुझे तेरी मोहब्बत का, आने से उसके आये बहार, चुरा लिया है तुमने जो दिल को, जब जब बहार आये इत्यादी गाणी यावेळी सादर करण्यात आली. रफीसाहेब फॅन्स क्लबच्या वतीने पहिला स्वरताज पुरस्कार सुभाष पिसाळ यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी यांनी रफी साहेबांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन फरांदे, इंद्रजा डेव्हलपर्सचे सचिन सावंत आणि कृषी मित्र अरुण आदलिंगे यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी अजित स्वीट होमचे प्रीतम खामकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी महेश सुरशे, विश्वास सोनवणे, अतुल संकपाळ, राजेश राजपूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास वाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.













