Thu, Jun 4, 2026
अध्यात्म

श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू
Ashok Ithape
  • PublishedJanuary 1, 2025
सातारा दि. 31 : पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा 9 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख  यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 प्रमाणे अधिकारास अनुसरुन पाल यात्रेतील मानकारी यांचे मानाचे बैलगाडीबाबतीत अटी व शर्थी संबंधीचे आदेश दि. 11 जानेवारी रोजीच्या सकाळी 8 पासून ते 12 जानेवारी सकाळी 6 पर्यंत जारी केले आहेत.
यात्रेत सामिल होणा-या बैलगाडीवान यांनी गाडी ओढणा-या बैलांना वेसन घातलेली असावी. तसेच नेहमी जुंपण्यात येणा-या व माणसाळलेल्या बैलांचाच वापर करावा. प्रत्येक गाडीत ५ पेक्षा जास्त लोकांनी बसू नये मिरवणुकीच्यावेळी दोन्ही बैलगाडयामध्ये सुरक्षित अंतर असावे. प्रत्येक गाडीमालकाने आपल्या गाडीपासून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
दि. ११ जानेवारी २०२५ रोजी मुख्य मिरवणुकी करीता ८ वाजता सर्व मानकरी यांनी आपल्या बैलगाडया/ट्रैक्टर/जिप घेवून           श्री बाबासाहेब इंजोजीराव पाटील पाल ता. कराड यांच्या वाडयासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. मुख्य मिरवणुकीतील वाहनांची व जनावरांची तपासणी संबधित तज्ञांकडून करवून घ्यावी व ते मिरवणुकीस वापरणेस योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे.
दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी श्री खंडोबा देवाचा लग्न सोहळा संपन्न झालेनंतर सर्व मानकरी आपआपल्या बैलगाड्या/ट्रॅक्टर/जिप घेवून त्यांचे मुक्कामांचे ठिकाणी घेवून जातील. दि.१२ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता रितीरिवाजाप्रमाणे मानकरी आपल्या बैलगाडया/ट्रॅक्टर/जिप बोहल्याच्या ठिकाणी मानाप्रमाणे उभ्या करतील. तेथून देवाची मुर्ती पालखीतून मंदिरात जाणेसाठी मिरवणुकीने निघताच सर्व मानक-यांनी आपल्या बैलगाडया/ट्रॅक्टर/जिप मिरवणुकीचे मार्गाने खंडोबा देवाच्या मंदिरात ६ वाजता आणाव्यात. देवाची मुर्ती मंदिराचे गाभा-यात ठेवल्यानंतर सर्वानी आप आपल्या गाड्या घेवून जाव्यात.
ज्या मानक-यांची वरील प्रमाणे वागण्याची इच्छा नाही त्यांनी आपल्या बैलगाडया/ट्रेक्टर/जिप मिरवणुकीमध्ये आणू नयेत.  मिरवणुकीतील मानकरी बैलगाडया/ट्रॅक्टर/जिप यांचे चालक यांना वरील नियमाप्रमाणे वागण्याचे बंधन राहिल. वरील नियमांचे उल्लघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई पात्र राहतील.
तसेच 11 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून मिरवणुकीसंबंधी मानकरी यांना वागण्याबाबत खालील नियम करण्यात आलेले आहेत.
यात्रेच्या मुख्य दिवशीच्या मिरवणुकीमध्ये सामिल होणा-या मानाचा घोडा यास लगाम घातलेला असावा. तसेच मिरवणुकीमध्ये माणसाळलेला, शिकाबू घोडयाचाच वापर करावा. इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
दि.११ जानेवारी रोजी मुख्य मिरवणुकी करीता ८ वाजता मानकरी बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा. पाल ता. कराड यांचे वाडयासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. दुपारी 2 वा. बैलगाडीतुन देव देवळातून मंडपातून मंडपाबाहेर आणलेनंतर तेथुन देवाची मिरवणुक मानकरी श्री. देवराज  पाटील रा. पाल ता. कराड यांचे समवेत मिरवणुकीने निघावे. सदरवेळी मानाचा घोडा व चोपदार यांनी मिरवणुकीचे पुढे रहावे. सायंकाळी सायं.6 वा. देवाचे लग्नाचा सोहळा संपन्न झालेनंतर मानकरी आपला घोडा आपले मुक्कामाचे ठिकाणी घेवून जातील.
मुख्य मिरवणुकीतील घोडयाची तपासणी संबधित पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करवून घ्यावी व ते मिरवणुकीस वापरणेस योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे.
मानकरी यांना वरील प्रमाणे अटी व शर्ती मान्य नसतील तर त्यांनी आपले घोडे मिरवणुकीमध्ये आणु नये.
मिरवणुकीतील मानकरी यांचे घोडयाचे चालक यांना वरील अटी व शर्तीप्रमाणे वागण्याचे बंधन राहिल. वरील नियमांचे उल्लघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाईस पात्र रहातील याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!