गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयाेजन
वाई, दि. १३: आगामी विधानसभा निवडणूकीकरीता सर्व कामगार व कर्मचारी न विसरता मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत व सक्षम करणार, अशी शपथ येथील गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीमधील कामगारांनी घेतली.
गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी कर्मचार्यांना मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदान जनजागृती विषयी पथनाट्य व पाेवाडा सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचार्यांनी मतदानाची शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंचायत समिती शिक्षण मंडळाचे गट शिक्षणाधिकारी व स्वीप नाेडल अधिकारी साईनाथ वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी शिक्षण मंडाळीतील २५-३० कर्मचारी कलाकारांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला हाेता. यावेळी पथनाट्य सादर करून मतदान हा आपला हक्क असून ताे हक्क बजावने गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच पाेवाड्यामध्ये काेणत्याही भूलथापांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान करणे गरजेचे असल्याचे पटवून देण्यात आले. यावेळी सर्व कामगार व कर्मचार्यांनी यावेळी हातात फलक घेऊन शपथ घेतली व मतदान करण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमास गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडंट अरविंद कुलकर्णी, व्यवस्थापक अनशुमन जगदाळे, शिक्षणाधिकारी व स्वीप नाेडल अधिकारी साईनाथ वालेकर, सुनील पानसे, माेहन फडके, गजानन जाधव, अविनाश भाेसले, महेश पवार, अक्षय शिंदे, आकाश धनवे तसेच कामगार व कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कुमार पवार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.













