वाई स्वच्छता चषक स्पर्धेचे संपूर्ण तालुक्यात आयोजन
![]()
उत्कृष्ठ तीन ग्रामपंचायतींना रोख रक्कम व सन्मानचिन्ह मिळणार
वाई / प्रतिनिधी : पंचायत समिती वाई यांच्यातर्फे वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वाई स्वच्छता चषक स्पर्ध राबविण्यात येणार आहे. पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन हे अभियान देशपातळीवर अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचे येत आहे. त्यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्यमान उंचविण्याकरिता वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन आदी विविध उपाययोजना शासनामार्फत गावपातळीवर राबविण्यात येतात. याकरिता सदर योजनेच्या कामाला गती मिळणे तसेच तालुक्यातील स्वच्छतेविषयक भेडसावणाऱ्या समस्यांना आळा घालणे, गावातील साथीचे रोगांवर उपाययोजना करणे ,गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे . त्याकरिता वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या संकल्पनेतून वाई स्वच्छता चषक स्पर्धेचा शुभारंभ आमदार मकरंद पाटील (आबा ) यांच्या हस्ते पंचायत समिती येथे करण्यात आला.
वाई स्वच्छता चषक स्पर्धेअंतर्गत विशेष स्वच्छता अभियान दि. 2 सप्टेंबर ते 15 ऑक्टोम्बर या कालावधीत “प्रतिदिन नविन उपक्रम” या वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येत आहेत. या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचे सहायक गटविकास अधिकारी बाळासो जाधव , उपअभियंता (ग्रा .पा .पु ), सुनील मेटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव, गटशिक्षण अधिकारी श्री. वाळेकर , तसेच सर्व विभागाचे खातेप्रमुख , विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, शाखा अभियंता, पाणी व स्वच्छता विभागाचे तालुका समन्वयक यांच्या मार्फत मूल्यांकन करण्यात येणार आहे. जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील गणेशोत्सव मंडळे, युवा मंडळातील कार्यकर्ते, गावामधील तरुण मुले -मुली, महिला आणि ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता उत्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.परीट यांनी केले आहे.
वाई स्वच्छता चषक स्पर्धेचा शुभारंभ नुकताच आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते व शशिकांत पिसाळ, माजी सभापती सौ. संगीता चव्हाण, सौ. सुनीता कांबळे, प्रमोददादा शिंदे, विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, मधुकरदादा भोसले, विजयकुमार परीट, साईनाथ वाळेकर, डॉ .संदीप यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.













