Fri, Apr 17, 2026
महिला विशेष सातारा जिल्हा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी केली कृतज्ञता व्यक्त

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी केली कृतज्ञता व्यक्त
Ashok Ithape
  • PublishedAugust 18, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद

सातारा दि.18 (जिमाका):  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का? या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीत.  हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला.
सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे संवाद साधत होते.  या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.
सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता.  दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागातून महिला मोठ्या प्रमाणावर सैनिक स्कूलच्या मैदानाच्या दिशेने येत होत्या. यावेळी जवळपास 50 हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आपल्या बहिणींशी मुख्यमंत्री संवाद साधत त्यांनी तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का?,  या पैशाचा उपयोग कसा करणार आहात? असे प्रश्न विचारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उत्स्फुर्त संवाद साधला.
यावर अनेक महिलांनी शिलाई मशिन घेणार आहोत,  मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणार आहोत. आमच्या मुलांना शिकवून मोठे करणार आहोत, असे सांगून  कृतज्ञता व्यक्त केली.  लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधून भविष्याच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी एका बहिणीने ज्या महिलांचे कधी खाते सुद्धा उघडले गेले नव्हते, अशा लाखो महिलांची खाती या योजनेमुळे बँकेत उघडली गेली आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत.  याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांना सलाम करते अशी भावनिक प्रतिक्रीया व्यक्त केली. यावेळी पन्नास हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिलांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मोबाईलचे टॉर्च दाखवून अभिवादन केले. याला तितक्याच उत्‍स्‌फुर्तेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रतिसाद दिला.   आगमनप्रसंगी महिलांनी फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या भाऊरायांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या घरी परत जात असताना सुखरुप व सुरक्षित जा, आपल्या संपुर्ण परिवारासोबत राखी पोर्णिमा सण उत्साहात साजरा करा अशा शुभेच्छा ही मुख्यमंत्री यांनी उपस्थितांना दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!