“ओटी सुरक्षित मातृत्वाची” कार्यक्रमाचे वाई तालुक्यामध्ये मंगळवारी आयोजन
![]()
पंचायत समितीच्या वाई आरोग्य, ग्रामपंचायत व बालविकास सेवा विभागातर्फे आयोजन
वाई / प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाई पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच आरोग्य आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ओटी सुरक्षित मातृत्वाची” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 13 ऑगस्ट रोजी वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एम. यादव, तसेच एकात्मिक बालविकास अधिकारी एस एस इंगवले यांनी दिली आहे.
वाई पंचायत समितीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातील माहितीनुसार, मातृत्व ही प्रत्येक स्त्रीची आणि तिच्या कुटुंबाची एक उदात्त भावना असते. गर्भवती स्त्रीची सुरक्षित आणि आरोग्यमय प्रसूती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते मात्र वाई तालुक्यात जुलै 2024 अखेर एक माता आणि 12 अर्भकांचे मृत्यू झाल्याची गंभीर बाब लक्षात आल्याने गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑगस्ट रोजी बालमृत्यू अन्वेषण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये अर्भक मृत्यू बालमृत्यू आणि गर्भवती माता यांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार 13 ऑगस्ट रोजी वाई तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गावनिहाय गर्भवती व स्तनदा माता यांचे मेळावे घेण्यात येऊन त्यांना गर्भावस्थेतील सेवा, तपासणी, उपचार, संदर्भसेवा याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.
अर्भक, माता व बाल मृत्यू यांचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच गरोदरपणात व बाळाच्या जन्मानंतर घ्यावयाची काळजी याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम होत असून ग्रामपंचायत आरोग्य आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग यांच्या सहकार्याने जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आयोजन, यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे व हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
देशाची भावी पिढी सशक्त व्हावी तसेच गर्भवती माता, स्तनदा माता यांच्या आरोग्याबाबत दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम हा उपक्रम वाईमध्ये होत आहे.
पंचायत समितीच्या सर्व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आदींच्या माध्यमातून ओटी सुरक्षित मातृत्वाची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीही संयोजकांतर्फे देण्यात आली आहे.













