Fri, Apr 17, 2026
आरोग्य

अद्ययावत ज्ञान व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांनी एकसंघ राहणे आवश्यक – डॉ युवराज करपे.

अद्ययावत ज्ञान व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांनी एकसंघ राहणे आवश्यक – डॉ युवराज करपे.
Ashok Ithape
  • PublishedJune 2, 2024

वाई,ता. १:- आज वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून दररोज नवीन व किचकट कायदे येत आहेत. याबाबतचे आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी तसेच बदलत्या परिस्थितीनुसार येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व डॉक्टरांनी एकसंघ रहाणे गरजेचे आहे. त्यासाठी’ एकी हेच बळ ‘ या उक्तीप्रमाणे आपल्या संघटनेची ताकद वाढवली पाहिजे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी येथे व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) वाई शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
येथील कन्या शाळेच्या सत्यवती सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. करपे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी होत्या. यावेळी डॉ. मंगला अहिवळे यांनी अध्यक्षपदाचा, डॉ. मेधा घोटवडेकर यांनी उपाध्यक्षपदाचा तर
डॉ. लता पाटील यांनी सचिवपदाचा कार्यभार मावळते पदाधिकारी अनुक्रमे डॉ. गजेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पोळ व सचिव डॉ. विनय लोखंडे यांच्याकडून स्वीकारला. कोषाध्यक्षपदी
डॉ.स्वाती देशपांडे यांची फेरनिवड झाली. कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ. उल्का पोळ आणि डॉ. उल्का कदम यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी मंचावर डॉ. परिन करपे व डॉ.महेश मेणबुदले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. करपे म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वाई शहरात जुन्या काळातील मिशन व जनरल हॉस्पिटल पासून वैद्यकीय सेवेची परंपरा मोठी आहे. अनेक वैद्यकीय व्यावसायिकांच्या रुग्णसेवेचा व सामाजिक कार्याचा, संघटनेचा नावलौकिक सर्व दूर पसरला आहे. वाईच्या मातीत माझा जन्म झाला असल्याने प्रशासकीय अधिकारी या नात्याने वाईतील सर्व डॉक्टर तसेच संघटनेच्या विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी निश्चित सहकार्य करेन याची ग्वाही देतो. वाई रोटरी क्लबच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचे त्यांनी कौतुक केले.

संजीवनी दळवी म्हणाल्या, कोरोना काळात जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांनी प्रशासनाला चांगली मदत केल्याचा अनुभव आला. वाईतील सर्व डॉक्टर
खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र आहेत याचा आनंद वाटला. सर्व पदाधिकारी महिला असल्याने संघटनेत ‘महिला राज ‘ आले आहे. महिलांना अनेक चांगल्या कल्पना सुचतात. त्यामुळे येणाऱ्या काळात संघटनेचे काम चांगले होईल अशी आशा आहे. त्यांच्या पाठीशी संपूर्ण
समाज ठामपणे उभे राहून चांगले काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करते.

मावळते अध्यक्ष डॉ.गजेंद्र पाटील व सचिव डॉ.प्रशांत पोळ यांनी मागील दोन वर्षातील संघटनेच्या कार्याचा आढावा मांडला. यावेळी डॉ गजेंद्र पाटील यांनी मागील कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचा पुस्तक देऊन सन्मान केला. नूतन अध्यक्षा डॉ. मंगला अहिवळे यांनी नवीन कार्यकारणी आणि आगामी दोन वर्षातील उपक्रमांची व योजनांची माहिती दिली. डॉ.विनय लोखंडे यांनी मागील दोन वर्षांचा आढावा सादर केला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पुजन करण्यात आले व कु रेयांश रोहित सुद्रिक याने अच्युतमं केशवमं हे ईशस्तवन सादर केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ प्रशांत पोळ व डॉ उल्का कदम यांनी करून दिला.

डॉ.स्वाती देशपांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. लता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास सौ अल्पना यादव,सौ हेमलता गायकवाड,श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, अॅड रमेश यादव, डॉ सतीश बाबर,डॉ मदन जाधव, डॉ बाळासाहेब येलमार ,डॉ विलास परामणे, डॉ चिंतामणी केळकर, डॉ विद्याधर घोटवडेकर,स्वप्निल गायकवाड,अरुण आदलिंगे तसेच आय एम ए चे सर्व सदस्य, उत्कर्ष पतसंस्था व रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच वाईकर नागरिक उपस्थित होते.

आय.एम.ए. ही वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या वाई शाखेचा पुढील दोन वर्षांसाठी संपूर्ण कार्यभार शहरातील ज्येष्ठ महिला डॉक्टर सांभाळणार आहेत. या निमित्ताने
संपूर्ण देशातल्या आय. एम. ए. च्या शाखांसाठी एक नवा वस्तूपाठ घालून दिला जात असून या संस्थेत एक नवा इतिहास रचला जातोय अशी भावना व्यक्त केली जात आहे.

,

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!