सातारा जिल्ह्यातील मान्यवरांना प्राईड आँफ इंडीया ‘भास्कर’ पुरस्कार जाहीर
वाई, दि. 20 : महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने 2024 मध्ये देण्यात येणारे दि प्राईड आँफ इंडीया- भास्कर अँवार्ड सातारा जिल्ह्यातील पाच मान्यवरांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये वाईतील बांधकाम उद्योजक सचिन जगन्नाथ सावंत, किकली येथील भैरवनाथ पोल्ट्री उद्योग समूहाचे संस्थापक संचालक व किकलीचे लोकनियुक्त सरपंच धनंजय बाबर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, वाई पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी साईनाथ वाळेकर, दांडेघर येथील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते विनोद कळंबे आदींचा समावेश आहे.
पणजी (गोवा) येथे रविवार, दि. 26 मे रोजी सकाळी 11 वाजता दिनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे होणा-या शानदार कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक विनायक खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्याचे माजी मुख्यमंत्री ना. प्रतापसिंह राणे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक, जर्नालिस्ट फौंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. मनिषा लोहार आदींच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांना भास्कर पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील लोककलाकारांचा लावणी महोत्सव कार्यक्रम होणार आहे.अशी माहिती संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार व उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांनी दिली.
वाईतील उद्योजक सचिन जगन्नाथ सावंत यांनी वाई परिसरांत बांधकाम व्यवसायात व वाईच्या सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. किकली येथील भैरवनाथ पोल्ट्री उद्योग समूहाचे संस्थापक संचालक श्री. धनंजय बाबर यांनी उद्योग व्यवसायाची भरभराट करीत अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच किकलीचे लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान मिळविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश वसंतराव गोंजारी यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून शासकीय सेवेत एक चांगला अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या कामाची पध्दत वेगळी असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला एक चांगला अधिकारी त्यांच्या रूपाने मिळालेला आहे.
गट शिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काम करताना वाई नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे . शिक्षण विभागात एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. दांडेघर पाचगणी येथील सामाजिक कार्यकर्ते असा लौकीक असलेले विनोद विठ्ठल कळंबे हे आपले आजोबा दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना धार्मिक, सामाजिक, राजकीय व बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. असे व्यक्तीमत्व असलेल्या वरील पाचही मान्यवरांच्या कार्याचा यानिमित्ताने गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रम भारत भूषण यु-ट्यूब चॅनेलवर दाखविण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













