“एक दिवस घरकुलासाठी”उपक्रमांतर्गत 75 घरकुलांच्या कामाची एकाच दिवशी पाहणी
![]()
वाई पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात शासकीय उपक्रमाची अंमलबजावणी.
वाई / प्रतिनिधी :
येथील पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शासकीय घरकुल योजनेच्या कामकाजांची पाहणी अधिकाऱ्यांमार्फत नुकतीच करण्यात आली. तालुक्यातील सुमारे 75 घरकुलांना “एक दिवस घरकुलासाठी” या उपक्रमांतर्गत 12 समन्वय अधिकाऱ्यांमार्फत एकाच दिवशी हा भेटीचा उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्यातील विविध गावांमध्ये पात्र व गरजू लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व मोदी आवास योजना या शासकीय उपक्रमांतर्गत घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे नेमकी कोणत्या टप्प्यावर आहेत, याची पाहणी करून ती वेळेत पूर्ण करण्यात बाबत संबंधित लाभार्थ्यांना सूचना देण्यासाठी व शासकीय योजनेची अंमलबजावणी उत्तमरीत्या होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संबंधित घरकुले वेळेत पूर्ण करण्यात यावीत या दृष्टीने बारा समन्वय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध 75 घरकुलांची पाहणी करून लाभार्थ्यांनी वेळेत घरकुले पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमामध्ये वाई पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली सांख्यिकी कृषी आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी रुपेश मोरे, राहुल हजारे तसेच महिला बाल कल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका यांनी सहभाग नोंदवला.
विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या घरकुलांमुळे संबंधित कुटुंबीयांच्या जीवनात आनंदाचे नवे पर्व निर्माण होत असल्याने शासकीय योजनेच्या अंमलबजावणी बरोबरच सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक समाधानाची भावनाही पूर्णत्वास जात असल्याची प्रतिक्रिया पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने व्यक्त केली आहे.













