देशात सध्या अघोषित हुकूमशाहीच कार्यरत – वाईतील सभेत शरद पवार यांचा आरोप
![]()
शशिकांत शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन
वाई / प्रतिनिधी : देशात सध्या लोकशाही नसून अघोषित हुकूमशाहीच कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत, हे कशाचे लक्षण आहे? तर ‘हम करे सो कायदा’ अशी वृत्ती सत्ताधाऱ्यांकडे असून हा प्रकार देशहिताचा नाही. त्यामुळे अशा गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांना हटवण्यासाठी शशिकांत शिंदे सारखा सर्वसामान्य घरातून आलेला उमदा कार्यकर्ता लोकसभेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांनी केले आहे.
महाविकास आघाडीतर्फे वाईतील भाजी मंडई परिसरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील,
धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे संदीप देसाई, सचिन मोहिते, अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी सभा घेत आहेत, असा आरोप करून शरद पवार म्हणाले की, मी काय केलं असा प्रश्न गृहमंत्री अमित शहा विचारतात मात्र प्रत्यक्षात त्यांनी नेमकं काय केलं हे मात्र सांगत नाहीत, अशी टीका करून शरद पवार म्हणाले की, सन 2004 ला मी देशाचा कृषि मंत्री होतो. त्यावेळी देशात अन्नधान्य कमी होतं. तेव्हा शेतकऱ्यांचें जीवनमान उचविण्यासाठी निर्णय घेत शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटीचें कर्ज माफ केलं. कांद्याची भाववाढ झाली म्हणून आंदोलन विरोधक करत होते. पण तेव्हा शेतकऱ्याच्या फायद्यासाठी भाववाढ मागे घेतली नाही.
![]()
दोन पक्ष फोडल्याची वार्ता करणाऱ्या फडणवीसांच्या या कृतीतून देशाचे राजकारण किती खालच्या पातळीला नेले आहे, हेच स्पष्ट होते. यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्या, असे आज ते म्हणत आहेत. मात्र गुजरातमध्ये चक्क महिलेवर अत्याचार करणारांचा ते सन्मान करतात. विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर खोटे गुन्हे दखल करून अटक करत आहेत. एकंदरीत या हुकुमशाही धोरणामुळेच देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की गेल्या दहा वर्षाच्या मोदींच्या सत्ता काळात महागाई अक्षरशः गगनाला भेटली आहे इंधनाचे भाव वाढले घरगुती गॅस आवाक्या बाहेर जात आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मातीमोल दर मिळत आहे. जर एखादा नेता ऐकत नसेल तर त्याला ईडीची भीती घातली जाते. शशिकांत शिंदे यांच्या बाबतीत असाच दिशाभूल करणारा गुन्हा दाखवून रडीचा डाव भाजप खेळत आहे. मात्र अशा चिरगुट मंडळींना मुहतोड जबाब देऊन आम्ही लक्षणीय विजय मिळवून याची आम्हास खात्री आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदींनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. जनतेतून प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्याने आता त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे.
बेकारी, अर्थव्यवस्थेचे वाटोळे, चीनने अतिक्रमण, शेतकऱ्यांवरील अन्याय या या सर्व विषयांमध्ये मोदींची नाचक्की झाली आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत पिछाडीवर जावे लागेल हे सत्य आहे.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे. वाई मतदारसंघ हा माझ्या विजयामध्ये निर्णायक आघाडी देईल. या भागात मोठया प्रमाणावर माथाडी कामगार आहेत. ते निश्चितच माझ्या पाठीशी राहतील. समोरच्या उमेदवारामुळेच खरे तर माझी निवडणूक आपोआप सोपी झाली आहे.
आ. बाळासाहेब पाटील यांनीही त्यांच्या भाषणात मतदारसंघातून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाची माहिती दिली.
श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या अलंकारीक भाषेत तुतारीला मतदान करण्याचे आवाहन केले.
डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी त्यांच्या भाषणात सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मोदींना हटवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देत देशात क्रांती घडवावी, असे आवाहन केले. तसेच धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडून देण्याचा हा पवित्र मोका आला असल्याचेही सांगितले.
अश्विनी महांगडे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व निष्ठावानांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे यांना नेत्यांप्रमाणेच आता जनता ही संधी देईल व ते खासदार म्हणून निवडून जातील, अशी विरोधकांसह सर्वांनाच खात्री पटली आहे.
यावेळी काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदांची जबाबदारी देण्यात येऊन याबाबतची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.













