महिलांनी उद्योग उभारणी करत स्वयंपूर्ण बनावे – याशनी नागराजन
सातारा दि.4(जिमाका): सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधताना ‘आरसेटीत प्राप्त केलेल्या ज्ञानातून कौशल्य विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे व त्यातूनच उद्योगाची उभारणी करून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे कारण महिला स्वयंपूर्ण झाल्यास कुटुंबाबरोबर देशही स्वयंपूर्ण होईल ‘असे मनोगत व्यक्त केले.
त्याचबरोबर आरसेटी करत असलेल्या कामाचे कौतुक केले तसेच आरसेटीने भविष्यातही असेच काम करावे व जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सातारा जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक श्री संतोष हराळे , जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री अंकुश मोटे व आरसेटीचे संचालक श्री प्रशांत पाटील व कर्मचारी उपस्थित होते.













