Mon, Mar 2, 2026
Uncategorized

भगवती ज्वेलर्सच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

भगवती ज्वेलर्सच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
Ashok Ithape
  • PublishedFebruary 17, 2024

सोन्याच्या गंठणमध्ये लोखंडाचा अंश सापडल्याने फसवणूक व  विश्वासघात केल्याचा ग्राहकाचा आरोप.     

सातारा / प्रतिनिधी :  येथील सदाशिव पेठेतील भगवती ज्वेल पॅलेस या सराफी दुकानाच्या मालकाने विक्री केलेल्या सोन्याच्या गंठणमध्ये लोखंडाच्या पदार्थाचे अवशेष आढळून आल्याने संबंधित ग्राहकाची फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकाराने सराफी बाजारपेठेसह संपूर्ण शहर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैदापूर येथील अश्विनी धनवे  यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी संबंधित सराफी दुकानातून तीन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे गंठण खरेदी केले होते. त्यावेळी तीन हजार रुपये ऑनलाईन व तीन लाख रुपये रोख दिल्यावर जीएसटी चे कारण सांगून दुकानातील तेजपाल राठोड यांनी दोन वेगवेगळ्या पावत्या दिल्या.

त्यानंतर 3 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित गंठण ठेवण्यासाठी स्टेट बँकेच्या कोंढवे शाखेत गेल्यावर तेथील व्हॅल्यूएटर श्री. महामुनी यांनी सोन्याची शुद्धता तपासताना संबंधित गंठण हे लोहचुंबकास चिकटत असल्याने त्यामध्ये लोखंडाच्या पदार्थांचा अंश असल्याने ते तारण ठेवता येणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, बँक मॅनेजर यांनीही तसेच सांगितल्याने संबंधित ग्राहकांनी भगवती ज्वेल पॅलेसच्या पावतीवरील फोन नंबर वर संपर्क साधला असता दुकानमालक जितेंद्र मुलसिंह राठोड हे बाहेरच्या देशात सहलीसाठी गेले आहेत. ते परत आल्यावर याबाबत कळवतो,  असे उत्तर देण्यात आले.

मात्र जितेंद्र राठोड हे साताऱ्यात आल्यानंतरही गंठण बदलून देण्यास टाळाटाळ करू लागले. वारंवार पाठपुरावा करूनही गंठण बदलून देण्यात वेळ काढू पणा करत असल्याने व प्रकरणास वेगळे वळण देत असल्याने भगवती ज्वेल पॅलेसचे मालक जितेंद्र मूलसिंह राठोड याच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पावत्या देऊन तसेच सोन्याच्या गंठणमध्ये लोखंडाचे अवशेष असलेले दागिने देऊन आमची फसवणूक व विश्वासघात केल्याची तक्रार अश्विनी धनवे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार जितेंद्र राठोड यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व तपासी अधिकारी श्री. साबळे अधिक तपास करत आहेत.

याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदारांनी पोलीस उपाधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेतली व हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर सौ. दलाल यांनी या प्रकरणी लक्ष घातले व तातडीने गुन्हा नोंद करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या. महिला ग्राहकाची होत असलेली फसवणूक पाहून सौ. दलाल यांनी  दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!